आयपीएल 2026 मधून पाच वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाला. 2023 मध्ये विजेता बनल्यानंतर ते सलग तिसऱ्या हंगामातून साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर झाले आहेत. आयपीएलच्या १९ व्या हंगामात सीएसके आठव्या स्थानी राहिला. संघाच्या अशा खराब कामगिरीमुळे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांना बदलण्याची जोरदार मागणी होत आहे. दरम्यान राहुल द्रविडला सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमावे, असे वृत्त समोर येत आहे. या अफवा आहेत, असे म्हणत फ्रॅंचायजीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी फेटाळून लावले आहेत.
फ्लेमिंगच्या भविष्याबद्दल सीएसकेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे विश्वनाथन यांनी क्रिकबजला सांगितले आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार फ्लेमिंग धोनीसोबत सीएसकेच्या पाचही विजेतेपदांचा भाग होता, मात्र गेल्या काही हंगामापासून संघासाठी गोष्टी नीट घडत नाहीयेत. मागील दोन वर्षांत आधुनिक टी२० शैलीने खेळावर वर्चस्व मिळवले असून यामध्ये सीएसके काहीसा मागे पडला आहे, हे फ्लेमिंग यांनी मान्य केले आहे. त्यासाठी त्यांनी आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्याआधी संघाची शैली बदलली, मात्र सध्याचा संघ अधिक तयार दिसला असला तरी दुखापतींनी त्यांना घेरले.
संघाची मागील तीन हंगामातील कामगिरी पाहिली तर त्यांना गुणतालिकेत ५ व्या, १० व्या आणि ८ व्या स्थानांवर समाधान मानावे लागले आहे. यादरम्यान त्यांनी १७ सामने जिंकले आणि २५ गमावले आहेत. अशी निराशाजनक कामगिरीमुळे फ्लेमिंगची जागा राहुल द्रविड घेतील अशा चर्चा सुरू झाल्या. भारताचे माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक द्रविड यांनी २०२६ च्या हंगामापूर्वी राजस्थान रॉयल्स सोडले होते. सध्या ते कोणत्याही आयपीएल संघाचे भाग नाहीत.
“फ्लेमिंग यांच्या कराराबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तशा चर्चाही सुरू केलेल्या नाही. आम्ही क्रिकेटशी संबंधित कोणत्याही गोष्टींवर सध्यातरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही योग्य वेळी मुल्यांकन करू”, असे विश्वनाथन म्हणाले आहेत.
फ्लेमिंग सध्या मेजर लीग क्रिकेटमधील टेक्सास सुपर किंग्ज आणि SA20 मधील जोबर्ग सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक आहेत. एमएलसी २०२६ हंगाम येत्या १८ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे फ्लेमिंग यांना त्या स्पर्धेतून हटवले जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच एमएस धोनी मुख्य प्रशिक्षक असणार का, याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. त्याला पुढील हंगामात खेळाडू म्हणून परतायचे की प्रशिक्षक किंवा मार्गदर्शन म्हणून संघात कायम राहायचे हा निर्णय फ्रॅंचायजीने संपूर्णपणे धोनीवर सोपवला आहे.






