राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं 2024 चा टी20 विश्वचषक जिंकला. या विश्वचषकानंतर द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ समाप्त झाला. आता त्यांचा मुलगा समित यानं वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. 18 वर्षाच्या समित द्रविडची भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली. भारतीय अंडर 19 संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय आणि 4 दिवसीय सामने खेळणार आहे.
समित उजव्या हातानं फलंदाजी करतो. याशिवाय तो उजव्या हातानं मध्यमगती गोलंदाजी देखील करतो. तो कर्नाटकच्या अंडर 19 संघाचा सदस्य राहिला आहे, ज्यानं 2023-24 हंगामात कूच बिहार ट्रॉफी जिंकली होती. याशिवाय समितनं लंकाशायर संघाविरुद्ध तीन दिवसीय सामन्यात कर्नाटक संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. सध्या तो महाराजा ट्रॉफी टी20 स्पर्धेत म्हैसूर वॉरिअर्स संघाकडून खेळतो आहे.
समित आता पहिल्यांदाच भारताच्या अंडर 19 संघात खेळताना दिसेल. मात्र तो 2026 मध्ये होणाऱ्या अंडर 19 विश्वचषकात खेळू शकणार नाही. वास्तविक, समितचा जन्म 10 नोव्हेंबर 2005 रोजी झाला. तो यावर्षी नोव्हेंबरमध्ये वयाची 19 वर्ष पूर्ण करेल. त्यामुळेच तो 2026 मध्ये होणाऱ्या अंडर 19 विश्वचषकामध्ये खेळू शकणार नाही, कारण तेव्हा त्याचं वय 20 वर्षांपैक्षा अधिक असेल. पुढील अंडर 19 विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबियात खेळला जाणार आहे.
भारताचा अंडर 19 संघ ऑस्ट्रेलियाच्या अंडर 19 संघाविरुद्ध 3 वनडे आणि 2 चार दिवसीय सामने खेळणार आहे. उभय संघांमधील वनडे सामने पुदुच्चेरी येथे तर चार दिवसीय सामने चेन्नई येथे खेळले जातील. वनडे मालिकेत मोहम्मद अमान भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर चार दिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी नेतृत्वाची जबाबदारी सोहम पटवर्धन याच्याकडे सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा –
बॅटिंगनंतर जो रुटची फिल्डिंगमध्येही कमाल! कसोटीतील राहुल द्रविडचा मोठा रेकॉर्ड धोक्यात
संघाला मोठा धक्का! भारत-बांग्लादेश कसोटी मालिकेपूर्वी स्टार खेळाडू जखमी
“माझं लक्ष्य आता…” सचिनचं रेकाॅर्ड मोडीत काढण्यावर रूटचं खळबळजनक वक्तव्य