भारतीय संघाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्याचा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली सध्या 16 देशांच्या मुलांना आणि मुलींना शिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे.
19 एप्रिलला लंडनमध्ये झालेल्या राष्ट्रकूल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत नरेंद्र मोदींनी भारत 16 वर्षाखालील मुले आणि मुलींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करेल तसेच त्यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भारताच्या सर्वोत्कृष्ट क्रिकेटर बरोबर अभ्यास करण्याची संधी देईल असे अश्वासन दिले होते.
त्यामुळे बीसीसीआय हे अश्वासन क्रीडा मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने पूर्ण करत आहे.
सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये बोत्सवाना, कॅमरॉन, केनिया, मोजांबिक, मॉरिशियस, नामीबिया, नायझेरिया, रवांडा, युगांडा, झांबिया, मलेशिया, सिंगापूर, जमैका, त्रिनीदाद, टोबैगा, फिजी आणि टांझानिया या देशांचे 18 मुले आणि 17 मुली प्रशिक्षण घेत आहेत.
बीसीसीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा एक महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम बेंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत 1 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रिकेट प्रमुख द्रविडच्या देखरेखीखाली देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांकडून या मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे.






