भारतीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले आहे. या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये राहुल द्रविडचे नाव नेहमीच वरच्या क्रमांकावर राहिले आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक विक्रम केले आहे. केवळ कसोटीतच नाही तर वनडे क्रिकेटमध्येही त्याने १० हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याची आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जोडीही खुप गाजली. काहीवर्षांपूर्वी द्रविडने त्याच्या कारकिर्दीत केलेल्या भागीदाऱ्यांबद्दल भाष्य केले होते.
जेष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी २००९ साली जेव्हा भारतीय संघाने न्यूझीलंड दौरा केला होता, तेव्हा राहुल द्रविडची मुलाखत घेतली होती. त्यावेळी द्रविडने एका सामन्यात शतकी भागीदारी साकारत विक्रम केला होता. त्याबद्दल लेले यांनी द्रविडला प्रश्न विचारले होते. द्रविडनेही त्याबद्दल मराठीत उत्तरे दिली होती. या मुलाखतीचा भाग लेले यांनी त्यांच्या ‘सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड’ या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की राहुल द्रविडने त्यावेळी सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याचा विक्रम केला होता, त्याबद्दल विचारले असता राहुल द्रविड म्हणाला होता, ‘मला खूप आनंद होतो. मी आशा संघात खेळलो आहे, ज्यात खूप महान क्रिकेटपटू होते. भागीदारी ही भागीदारी असते, तुम्ही ती एकटी कधीच करु शकत नाही, तुम्हाला दुसऱ्यांची तरी मदत लागले. मी भाग्यवान आहे की माझ्या कारकिर्दीत असे महान फलंदाज होते, जसे तेंडुलकर, लक्ष्मण, सेहवाग, गांगुली, अझरुद्दीन, गंभीर अशांबरोबर मी खेळलो आणि मी त्यांच्याबरोबर भागीदारी करु शकलो. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.’
राहुल द्रविडच्या नावावर कसोटीमध्ये सचिन तेंडुलकरबरोबर २० शतकी भागीदारी करण्याचा विश्वविक्रमही आहे. तसेच द्रविडने व्हीव्हीएस लक्ष्मणबरोबरही १२ शतकी भागीदारी केल्या आहेत. तसेच द्रविड कारकिर्दीत एकून ८८ शतकी भागीदाऱ्यांचा भाग राहिला आहे, जो विश्वविक्रम आहे.
पुढे लेले यांनी द्रविडला जेव्हा सचिन आणि लक्ष्मण यांच्याबरोबरच्या भागीदाऱ्यांबद्दल विचारले, तेव्हा द्रविड म्हणाला होता, ‘आम्ही १०-१२ वर्षे एकत्र खेळलो आहे. आम्हाला एकमेकांचे स्वभाव, एकमेकांचा खेळ माहित झाला आहे, सगळं इतकं चांगले माहित झाले आहे की आम्हाला काय होत आहे हे आम्हाला मधे बोलावे पण लागत नाही. आमचं लक्ष कधी विचलित झाले आहे, हे आम्हाला कळतं. त्यामुळे आम्ही एकमेकांना पाठिंबा देऊ शकतो. आम्ही एकत्र इतके वर्षे खेळलो असल्याने आम्हाला समोरचा खेळाडू काय करणार आहे, हे कळतं.’
वनडेमध्ये २ वेळा ३०० भागीदारी
राहुल द्रविडने त्याच्या १६ वर्षांच्या कारकिर्दीत ४८ शतकांसह २४२०८ धावा केल्या. तसेच अनेक विक्रमही केले आहेत. पण असा एक विश्वविक्रम आहे, जो केवळ त्याच्या नावावर आहे; तो म्हणजे वनडेमध्ये त्याने २ वेळा आपल्या साथीदाराबरोबर ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या भागीदारी केली आहे. आत्तापर्यंत कोणालाही वनडेत २ वेळा ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या भागीदारी करता आलेली नाही.
द्रविडने पहिल्यांदा २६ मे १९९९ ला सौरव गांगुलीबरोबर विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध वनडेत ३१८ धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर ६ महिन्यांनी द्रविडने ८ नोव्हेंबर १९९९ ला सचिन तेंडूलकर बरोबर न्यूझीलंडविरुद्ध हैद्राबाद येथे ३३१ धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी ही वनडेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली होती. त्यानंतर हा विक्रम २०१५ पर्यंत अबाधित होता. नंतर २०१५ मध्ये ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्यूएल्सने झिम्बाब्वे विरुद्ध ३७२ धावांची भागीदारी करत हा विक्रम मोडला.
सचिन तेंडुलकरबरोबर द्रविडची भागीदारी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भागीदारीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्यांमध्ये द्रविड आणि सचिन यांची जोडी चौथ्या क्रमांकावर आहे. त्यांनी २४१ डावात एकूण ११०३७ धावा केल्या आहेत. तसेच यात ३१ शतकी भागीदाऱ्यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अजिंक्य रहाणेला १२ वर्षांपूर्वी ‘द वॉल’ राहुल द्रविडने दिला होता ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
‘द्रविडची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होणार असल्याची खेळाडूंना नव्हती कल्पना’, रोहितचा खुलासा