राहुल द्रविड यांनी नुकतेच मुख्य प्रशिक्षक म्हणून भारताला टी20 विश्वचषक जिंकून दिला. आता त्यांचा कार्यकाळ संपला असून ते संघापासून वेगळे झाले आहेत. ते आयपीएलच्या पुढील हंगामात राजस्थान रॉयल्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सामिल होऊ शकतात, असं बोललं जात आहे. ते राजस्थान रॉयल्सकडून खेळलेही आहेत आणि संघाच्या कोचिंग स्टाफचाही भाग राहिले आहेत. या दरम्यान राहुल द्रविड यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली. वास्तविक, त्यांचा एका विशेष पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
2028 च्या ऑलिम्पिकसाठी ‘ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश’ यावर चर्चा करण्यासाठी राहुल द्रविड एका विशेष पॅनेलमध्ये सामील होणार आहेत. द्रविड हे पॅनेलमधील प्रमुख नावांपैकी एक आहे. त्यांच्यासह आयसीसीचे सीईओ आणि ड्रीम स्पोर्ट्सचे सह-संस्थापक हर्ष जैन देखील पॅनेलमध्ये सहभागी होतील. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची ही दुसरी वेळ असेल. याआधी 1900 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला होता. या पॅनेलची बैठक ऐतिहासिक इंडिया हाऊस येथे होणार आहे.
आयसीसीचे सीईओ ज्योफ ॲलार्डिस म्हणाले, “आम्ही जगभरात क्रिकेट वाढवणं, खेळाकडे अधिक चाहत्यांना आकर्षित करणं, खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर स्पर्धा करण्याची संधी देणं आणि आता क्रिकेटला ऑलिम्पिक पर्यंत नेणं यावर लक्ष केंद्रित करत आहोत. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश हा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 कडे आम्ही या प्रवासातील एक प्रेरणा म्हणून पाहतो.”
राहुल द्रविड यांनी 2021 च्या अखेरीस टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून टी20 विश्वचषक 2024 पर्यंत ते संघासोबत राहिले. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली टीम इंडिया 17 वर्षांनंतर टी20 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनली. राहुल द्रविड यांचा कार्यकाळ 2023 एकदिवसीय विश्वचषकानंतर कार्यकाळ संपत होता. परंतु बीसीसीआयनं 2024 टी20 विश्वचषक लक्षात घेऊन त्यांचा कार्यकाळ वाढवला होता. याशिवाय राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात भारतानं जागतिक कसोटी चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची फायनल गाठली होती.
हेही वाचा –
जेव्हा सहकारी खेळाडूंच्या तक्रारीवरून सूर्याला सोडावं लागलं होतं कर्णधारपद, मुंबई रणजी संघात झाला होता मोठा राडा!
आयसीसी रँकिंगमध्ये रोहित शर्माची घसरण, इंग्लंडच्या फलंदाजानं मिळवलं टॉप 5 मध्ये स्थान
खेळाच्या विश्वातील सुपरस्टार! या क्रिकेटपटूच्या पत्नीनं ऑलिम्पिकमध्ये जिंकली आहेत 2 पदकं