भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंड संघाला व्हाईट वॉश देत द्रविड युगाची सुरुवात केली आहे. द्रविड पुढील दोन वर्षे संघाचे प्रशिक्षक असतील. यापूर्वी त्यांनी श्रीलंका दौऱ्यात संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. मात्र, आता ते पूर्णवेळ संघाचे प्रशिक्षक बनले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या नऊ वर्षानंतरही द्रविडचा चाहतावर्ग मोठा आहे. केवळ सामान्य चाहतेच नाही तर बॉलिवूडमधील काही सौंदर्यवतीही त्याच्या चाहत्या राहिल्या आहेत. या यादीत बॉलीवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा हिच्या नावाचाही समावेश आहे. रिचा चढ्ढाने राहुल द्रविडला तिचे पहिले प्रेम असल्याचे म्हटले आहे.
रिचा चढ्ढाने एका मुलाखतीत सांगितले की ती आता नियमित क्रिकेट पाहत नाही. परंतु, कधीकधी फक्त द्रविडला पाहण्यासाठी तिच्या भावासोबत सामने पाहायची. रिचा चड्ढा म्हणाली की, द्रविड निवृत्त झाल्यावर तिने क्रिकेट पाहणे बंद केले होते. रिचा म्हणाली, “माझ्या लहानपणी मी क्रिकेटची फार मोठी चाहती नव्हती. माझा भाऊ क्रिकेट खेळायचा. एक काळ असा होता की कधीतरी मी टीव्हीवर क्रिकेटचे सामने बघायचे. मला राहुल द्रविडला खेळताना बघायला खूप आवडायचं. त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मी क्रिकेट पाहणे बंद केले. माझे पहिले प्रेम राहुल द्रविड होते.’
रिचा चढ्ढाची इनसाईड एज नावाची एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात ती विवेक ओबेरॉय सोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
टी२० विश्वचषक २०२१ संपल्यानंतर राहुल द्रविड यांनी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. राहुल द्रविड यांनी रवी शास्त्रीची जागा घेतली. भारतीय संघाचा ‘मिस्टर वॉल’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या द्रविडने भारतासाठी १६४ कसोटी आणि ३४४ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात त्याने अनुक्रमे १३२८८ आणि १०८८९ धावा केल्या आहेत.