इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची काळ घोषणा करण्यात आली. या संघात हरियाणाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवातिया याचीही निवड झाली आहे. लेगस्पिन गोलंदाजी आणि डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी करणाऱ्या राहुलला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
मागील वर्षी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून दमदार कामगिरी केल्यानंतर राहुल प्रकाशझोतात आला होता. विशेषतः किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळतांना शेल्डन कॉट्रेलला एकाच षटकात मारलेल्या पाच षटकारांनंतर त्याची सर्वाधिक चर्चा झाली होती. त्यांनतर आयपीएलमधील सातत्यपूर्ण कामगिरी तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील उल्लेखनीय प्रदर्शन याचे फळ आता राहुलला मिळाले आहे. भारतीय संघात निवड झाल्यानंतर त्याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
“टी-२० विश्वचषक खेळण्याचे लक्ष्य”
इंग्लंडविरुद्धची मालिका ही भारतीय संघाची टी-२० विश्वचषकापूर्वीची शेवटची आंतरराष्ट्रीय टी-२० मालिका असेल. त्यांनतर भारतीय संघ थेट सप्टेंबर महिन्यात विश्वचषकात उतरेल. विशेष म्हणजे हा विश्वचषक भारतातच आयोजित करण्यात आला आहे. याबाबत बोलतांना राहुल तेवातियाने या टी-२० विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करायचे असल्याचे विधान केले. त्यामुळे हेच लक्ष्य निश्चित करून मी भारतासाठी आगामी मालिकेत उत्तम प्रदर्शन करेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
आपल्या आत्तापर्यंतच्या क्रिकेट प्रवासाबद्दल बोलताना राहुल म्हणाला, “युझवेंद्र चहल, जयंत यादव आणि अमित मिश्रा असे एकाहून एक सरस फिरकीपटू असलेल्या हरियाणा संघात स्थान मिळवणे सोपे नव्हते. हरियाणा संघात स्थान मिळवणे कोणत्याही फिरकीपटूसाठी कठीण आहे. मात्र माझ्या प्रशिक्षकांनी दिलेल्या सल्ल्यानंतर मी माझ्या फलंदाजीत सुधारणा करून हरियाणा संघात स्थान पक्के करू शकलो. हरियाणासाठी चांगले प्रदर्शन केल्यानंतर मला आत्मविश्वास मिळालाच, त्याशिवाय माझ्या खेळातही बरीच सुधारणा करता आली.”
भारतीय संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक
भारतीय संघाकडून खेळण्याबाबत काय भावना आहेत या प्रश्नावर तेवातिया म्हणाला, “आत्तापर्यंत मी आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या विरुद्ध खेळलो आहे. आता मी त्याच्यासोबत खेळेल आणि तसेच ड्रेसिंग रूम शेअर करेल. मी त्याच्यासह आणि सध्याच्या क्रिकेटमधील काही सर्वोत्तम खेळाडूंसह ड्रेसिंग रूम शेअर करण्यासाठी आतुर आहे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळेल. अव्वल खेळाडूंचा ते कशाप्रकारे सामना करून यश मिळवतात, हे समजून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.”
महत्वाच्या बातम्या:
बुमराह आणि शमीला टी२० संघातून डच्चू देण्यामागचे कारण काय? घ्या जाणून
रॉबिन उथप्पाची बॅट तळपली; आयपीएल २०२१ मध्ये धोनीच्या सीएसकेला जिंकून देणार चौथे जेतेपद?
मला कुणीच कसं विकत घेतलं नाही? IPL खेळता येणार नसल्याने दुःखी झाला खेळाडू; म्हणाला, ही लाजिरवाणी बाब