महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2025 मध्ये गुरुवारी (12 जून) एकच सामना खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ईगल नाशिक टायटन्स व तळाच्या स्थानात असलेल्या रायगड रॉयल्स यांच्या दरम्यान हा सामना होणार आहे. नाशिक सलग पाचवा विजय मिळवण्यासाठी तर रायगड आपल्या दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील असेल.
एमपीएल 2024 मध्ये ईगल नाशिक टायटन्स उपविजेता ठरला होता. मात्र, नव्या हंगामात त्यांनी विजेतेपदाचे ध्येय समोर ठेवल्याचे दिसते. आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यात त्यांनी विरोधी संघांना पराभूत केले आहे. सलग चार विजयासह ते गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहेत. दुसऱ्या बाजूला रायगड रॉयल्स संघाने सातारा वॉरियर्सला हरवून चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर सलग दोन सामन्यात त्यांना दारूण पराभव स्विकारावे लागले. नाशिक संघाला धक्का देत स्पर्धेत पुनरागमन करण्यासाठी ते प्रयत्नशील असतील.
ईगल नाशिक टायटन्स संघाच्या सर्वच खेळाडूंनी आत्तापर्यंत योगदान दिले आहे. फलंदाजीत मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, साहिल पारख व अथर्व काळे यांनी सातत्य दाखवल्याचे दिसते. तर गोलंदाजीत कर्णधार प्रशांत सोलंकी, मुकेश चौधरी व अक्षय वायकर यांनी मॅचविनिंग गोलंदाजी केली आहे. रायगड रॉयल संघाबाबत सांगायचे झाल्यास कर्णधार ऋषभ राठोड वगळता अन्य कोणताही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकला नाही. दिग्विजय पाटील व सिद्धेश वीर यांना पूर्णतः अपयश आल्याचे दिसते. गोलंदाजीत विकी ओस्तवाल व तनय संघवी यांना देखील आपले छाप पाडता आली नाही. त्यामुळे त्यांचा संघ केवळ एका विजयासह पाचव्या क्रमांकावर आहे.
एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे होणाऱ्या या सामन्यात खेळपट्टी फलंदाजांना अधिक पोषक असू शकते. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देऊ शकतो. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल.
संभाव्य प्लेईंग इलेव्हन
ईगल नाशिक टायटन्स- मंदार भंडारी, अर्शिन कुलकर्णी, रणजित निकम, साहिल पारख, अथर्व काळे, रोहन दामले, कौशल तांबे, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, मनोज इंगळे व अक्षय वायकर.
इम्पॅक्ट प्लेअर- योगेश डोंगरे
रायगड रॉयल्स- सिद्धेश वीर, हर्ष मोगावीरा, दिग्विजय पाटील, ऋषभ राठोड, ऋग्वेद मोरे, हर्ष संघवी, विकी ओस्तवाल, तनय संघवी, हितेश वाळुंज, निखिल कदम व सागर जाधव.
इम्पॅक्ट प्लेअर- रवींद्र जाधव






