---Advertisement---

राहुल होता नशिबाच्या रथावर स्वार, ३ वेळा मिळाले जीवनदान, राजस्थानला चूक सुधारणे गरजेचे; नाहीतर…

On: बुधवार, सप्टेंबर 22, 2021 12:08 PM
---Advertisement---

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील ३२ वा सामना पार पडला. या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्स आणि केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाब किंग्स संघ आमने सामने होता. दोन्ही संघांमध्ये विस्फोटक फलंदाजी करणारे फलंदाज होते, त्यामुळे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडणे स्वाभाविक होते. त्यामुळे दोन्ही संघांकडून तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. दरम्यान पंजाबचा कर्णधार केएल राहुलला नशीबाने भरपूर साथ दिल्याचे दिसले. त्याला एक, दोन नव्हे तर तब्बल तीन वेळेस जीवनदान मिळाले होते.

पंजाब किंग्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८६ धावांची आवश्यकता होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा पंजाब संघ मैदानात आला, त्यावेळी पंजाब संघातील गोलंदाजांनी संथ गतीने सुरुवात केली होती. पावरप्लेचे षटक सुरू असताना राजस्थान रॉयल्सच्या गोलांदाजांना केएल राहुलला अनेकदा बाद करण्याची संधी मिळाली. परंतु केएल राहुलला त्याच्या नशीबाची साथ मिळाली आणि तो एकापाठोपाठ एक तीन वेळेस बाद होण्यापासून बचावला.

केएल राहुलला पहिल्यांदा जीवनदान तेव्हा मिळाले, जेव्हा तो अवघ्या २ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या एविन लुईसने त्याचा सोपा झेल सोडला. त्यानंतर २९ धावांवर फलंदाजी सुरू असताना, रियान परागने देखील त्याचा झेल सोडला. तसेच ३१ धावांवर फलंदाजी करत असताना, चेतन सकरियाने देखील झेल सोडत केएल राहुलला जीवनदान दिले.

केएल राहुलला तीन वेळेस संधी मिळाली होती. ज्यामुळे चाहत्यांना असे वाटू लागले होते की, तो हा सामना जिंकून पॅव्हेलियनमध्ये परतणार. परंतु असे झाले नाही, चौथ्यांदा राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंना संधी मिळाली आणि त्यांनी ही संधी गमावली नाही. तो ३३ चेंडूंमध्ये ४९ धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. परंतु जेव्हा तो माघारी परतला त्यावेळी पंजाब किंग्स संघाने सामन्यावर मजबूत पकड बनवली होती.

या सामन्यात पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्स संघाकडून यशस्वी जयस्वालने ४९ धावांची खेळी केली होती. तर महिपाल लोमरोरने ४३ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर रॉयल्स संघाला २० षटक अखेर १८५ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना मयंक अगरवालने सर्वाधिक ६७ तर कर्णधार केएल राहुलने ४९ धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात पंजाब किंग्स संघाला विजय मिळवण्यासाठी ४ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना या धावा करता आल्या नाही. परिणामी राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---