इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम सध्या भारतात सुरु आहे. पण हा हंगाम राजस्थान रॉयल्स संघासाठी धक्का देणारा हंगाम ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी या हंगामात पहिल्या ४ पैकी केवळ १ सामना जिंकला आहे. त्यातच संघाचा भाग असलेले बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे खेळाडू दुखापतीमुळे तर लियाम लिव्हिंगस्टोन बायो बबलमध्ये मानसिक त्रास होत असल्याच्या कारणाने या हंगामातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे या खेळाडूंना बदली खेळाडू शोधण्याचे आव्हान राजस्थान समोर आहे.
यादरम्यान, माध्यमांतील वृत्तानुसार राजस्थान बेन स्टोक्सचा बदली खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या रस्सी वॅन दर डसन या खेळाडूला संघात सामील करण्याचा विचार करत आहे.
नेटवर्क २४ स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार राजस्थान रॉयल्सने वॅन दर डसनला संघात सामील होण्यासाठी विनंती केली असून त्यासाठी त्याला केवळ तंदुरुस्ती चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. तरी अजून राजस्थानने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
वॅन दर डसन आहे चांगल्या फॉर्ममध्ये
वॅन दर डसन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच पाकिस्तानविरुद्ध झालेल्या वनडे आणि टी२० मालिकांमध्ये चांगली कामगिरी बजावली होती. वनडे मालिकेत त्याने १ शतक आणि १ अर्धशतक केले होते. तर टी२० मालिकेतही १ अर्धशतक केले होते.
टी२० कारकिर्दही आहे चांगली
रस्सी वॅन दर डसनची टी२० क्रिकेट कारकिर्दही चांगली आहे. त्याने आत्तापर्यंत १२६ टी२० सामने खेळले असून ३८.६२ च्या सरासरीने ३ शतके आणि २६ अर्धशतकांसह ३८२४ धावा केल्या आहेत. तरी त्याने अजूनपर्यंत आयपीएलमध्ये एकाही संघाचे प्रतिनिधित्व केलेले नाही. त्यामुळे जर त्याला राजस्थान रॉयल्सकडून संधी मिळाली तर तो आयपीएलमध्ये पदार्पण करु शकतो.
गेलचा झेल घेताना झाली होती स्टोक्सला दुखापत
खरंतर बेन स्टोक्स यंदा संपूर्ण हंगामात खेळणार होता. मात्र, पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळताना त्याला ख्रिल गेलचा झेल घेण्याच्या प्रयत्नात हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्याचीही गरज पडल्याने तो मायदेशी परतला. तो आता जवळपास ३ महिन्यांसाठी क्रिकेटपासून दूर झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला वार्षिक करार, बड्या खेळाडूंना मिळाला डच्चू
मोठी बातमी! राजस्थानला आणखी एक मोठा धक्का; स्टोक्सपाठोपाठ ‘हा’ प्रमुख खेळाडूही आयपीएलमधून बाहेर
देवदत्त पडीक्कलच्या कामगिरीने ‘हे’ महान क्रिकेटपटूही झाले खुष; म्हणाले, लवकरच भारतीय संघाकडून खेळेल