भारतात सध्या इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरलच्या पार्श्वभूमीवर खेळवला जात आहे. त्यामुळे सर्व संघ बायो-बबलमध्ये असून सामनेही प्रेक्षकांविना होत आहेत. असे असतानाच हा हंगाम राजस्थान रॉयल्स संघासाठी अत्यंत धक्का देणारा ठरत आहे. त्यांचे एक एक करुन परदेशी खेळाडू या हंगामातून बाहेर पडत आहेत. आता राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज अँड्र्यू टाय यानेही या हंगामातून माघार घेतली असून तो ऑस्ट्रेलियाला परतला आहे.
अँड्र्यू टाय ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याबद्दल राजस्थान रॉयल्सने ट्विट करत माहिती दिली आहे. त्याने वैयक्तिक कारणाने माघर घेतली असल्याची माहिती राजस्थानने दिली आहे. पण त्याने कोविड-१९चा भारतातील वाढता प्रभाव पाहून माघार घेतली असल्याचे म्हटले जात आहे. पण अजून याबद्दल खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.
त्याच्याबद्दल राजस्थान रॉयल्सने ट्विट केले आहे की ‘अँड्र्यू टाय आज (२५ एप्रिल) सकाळी वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलियाला परत गेला आहे. आम्ही त्याला आवश्यक तो पाठिंबा कायम देत राहू.’
AJ Tye flew back to Australia earlier today due to personal reasons. We will continue to offer any support he may need.#RoyalsFamily
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 25, 2021
आयपीएलच्या १४ व्या हंगामातून बाहेर होणारा टाय राजस्थानचा चौथा परदेशी खेळाडू
राजस्थानला यंदा सुरुवातीपासूनच मोठे धक्के बसले आहेत. टाय हा आयपीएल २०२१ मधून बाहेर पडणारा राजस्थान रॉयल्सचा चौथा परदेशी खेळाडू आहे. यापूर्वीच राजस्थान संघाचा भाग असलेले बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर हे खेळाडू दुखापतीमुळे तर लियाम लिव्हिंगस्टोन बायो बबलमध्ये मानसिक त्रास होत असल्याच्या कारणाने या हंगामातून बाहेर झाले आहेत.
आर्चर दुखापतीमुळे या हंगामासाठी भारतात आलेलाच नाही, तर बेन स्टोक्स या हंगामातील पहिलाच सामना खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी लिव्हिंगस्टोनने बायो-बबलचा त्रास झाल्याने माघार घेतली होती. त्यामुळे आता राजस्थानच्या ताफ्यात जोस बटलर, ख्रिस मॉरिस, डेव्हिड मिलर आणि मुस्तफिजूर रेहमान हे चारच परदेशी खेळाडू उरले आहेत.
Liam Livingstone has flown back home late last night, due to bubble fatigue accumulated over the past year. We understand and respect his decision, and will continue supporting him in any way we can.#RoyalsFamily pic.twitter.com/stYywf3tBW
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 20, 2021
अँड्र्यू टायची आयपीएलमधील कामगिरी
अँड्र्यू टायला २०२१ हंगामात एकही सामना खेळण्याची संधी जरी मिळाली नसली तरी त्याची एकूण आयपीएलमधील कामगिरी चांगली आहे. त्याने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये २७ सामने खेळले असून २१.८० च्या सरासरीने त्याने ४० विकेट्स घेतल्या आहेत. तो २०१८ साली आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने २०१८ च्या हंगामात पंजाब किंग्सकडून खेळताना १४ सामन्यांत २४ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! दिल्ली कॅपिटल्सच्या आर अश्विनने घेतली आयपीएल २०२१ हंगामातून विश्रांती; ‘हे’ आहे कारण
आयपीएल इतिहासात ‘या’ गोलंदाजांनी केली आहे सुपर ओव्हरमध्ये सर्वाधिकवेळा गोलंदाजी
SRH vs DC : केन विलियम्सनचे अर्धशतक व्यर्थ; दिल्लीचा सुपर ओव्हरमध्ये हैदराबादवर रोमांचक विजय