इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सने धमाकेदार सुरूवात केली आहे. त्यांनी सोमवारी (३० मार्च) गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात रवींद्र जडेजाने केलेल्या उत्साही सेलिब्रेशनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तसेच तो या सामन्यात आक्रमकबरोबर भावूकही झालेला दिसला.
जडेजाने सीएसकेच्या शिवम दुबेला बाद केल्यानंतर गन सेलिब्रेशन केले होते. त्याच्या या सेलिब्रेशनबाबत सामन्यानंतर जियोस्टारच्या पॅनेलचे भारताचे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि अनिल कुंबळे यांनी विचारले की हे काही नवे सेलिब्रेशन आहे का?
जडेजा म्हणाला, “मी जेव्हा सीएसकेसाठी खेळायचो तेव्हा असे सेलिब्रेशन करत होतो, म्हणून मला वाटलं, इथेही हेच का पुढे चालू ठेवू नये.”
या सामन्यात जडेजाने दुबेची विकेट घेतली त्याबद्दल तो म्हणाला, “मी दुबेला खूप काळापासून ओळखतो. मी त्याला नेट्समध्ये (सराव सत्रात) अनेकदा गोलंदाजी केली आहे, त्यामुळे तो नक्की काय करण्याचा प्रयत्न करेल, याची मला स्पष्ट कल्पना होती. मी चेंडू ऑफ-स्टंपच्या अगदी बाहेर टाकला, कारण मला माहित होते की तो एखादा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात असेल.”
“फलंदाजीसाठी ही खेळपट्टी कठीण आहे, काही वेळा तर चेंडू वळतही होता. माझे काम केवळ चेंडू योग्य टप्प्यावर टाकणे हे होते. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीला हलक्यात घेऊ शकत नाही. मग लक्ष्य काहीही असो, तरीही तुम्हाला चांगले फटके खेळावेच लागतात,” असेही जडेजाने पुढे म्हटले आहे.
या सामन्यात राजस्थानने सीएसकेला १२७ धावसंख्येवरच रोखले. त्यामध्ये जडेजाने ३ षटकात १८ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने इम्पॅक्ट प्लेयर सरफराज खान याचीही विकेट घेतली. प्रत्युत्तरात राजस्थानने आक्रमक सुरूवात करत १२.१ षटकात २ विकेट्स गमावत सामना जिंकला.
राजस्थानचा पुढील सामना ४ एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.






