इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. मात्र, काही संघ असेही आहेत, ज्यांनी अद्याप त्यांच्या कर्णधाराचं नाव निश्चित केलेलं नाही. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)चाही समावेश आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की विराट कोहली पुन्हा एकदा आरसीबीची जबाबदारी स्वीकारू शकतो. मात्र आता या पदासाठी एक नवं नाव समोर आलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फाफ डु प्लेसिस हा आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचा कर्णधार होता. परंतु फ्रँचायझीने मेगा लिलावात त्याला खरेदी केलं नाही. जेव्हा आरसीबीनं डू प्लेसिसला सोडलं, तेव्हा विराट कोहली कर्णधार बनण्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, संघात आणखी एक युवा खेळाडू आहे, जो पुढचे अनेक वर्ष आरसीबीचं नेतृत्व करू शकतो. आरसीबीनं विराटसोबत या खेळाडूला रिटेन केलं होतं. रजत पाटीदार असं या खेळाडूचं नाव आहे.
सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणारा रजत पाटीदार जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील पाच डावांमध्ये पाटीदारनं 78, 62, 68, 4 आणि 36 धावा केल्या आहेत. पाटीदारनं आपल्या दमदार फलंदाजीनं आरसीबीमध्ये तिसऱ्या क्रमांकावरील आपलं स्थान निश्चित केलं आहे. याशिवाय तो एक उत्कृष्ट फलंदाज असण्यासोबतच उत्तम कर्णधारही आहे. सध्या जारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं हे सिद्ध केलंय.
विराट कोहली आयपीएलमध्ये बराच काळ आरसीबीचा कर्णधार होता. मात्र, 2022 मध्ये त्यानं स्वेच्छेनं कर्णधारपद सोडलं. त्यानंतर आरसीबीनं फाफ डू प्लेसिसकडे संघाची कमान सोपवली. मेगा लिलावापूर्वी आरसीबी केएल राहुलला विकत घेऊन त्याला कर्णधार बनवणार असल्याची बातमी होती, मात्र लिलावात असं काही घडलं नाही.
आयपीएल 2025 साठी आरसीबी संघ – विराट कोहली, रजत पाटीदार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेजलवुड, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड. नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथल, देवदत्त पडिक्कल, स्वस्तिक चिकारा, लुंगी एनगिडी, अभिनंदन सिंग आणि मोहित राठी
हेही वाचा –
भरकटलेल्या पृथ्वी शॉला दिग्गज क्रिकेटपटूंचा पाठिंबा, केविन पीटरसन म्हणाला…
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा; वनडे, टी20 सह कसोटी मालिकाही खेळवली जाणार
दे चौका, दे छक्का! नेपाळ प्रीमियर लीगमध्ये शिखर धवनचा धुमधडाका