---Advertisement---

पेल्यातील वादळ शमले; भारत-पाक सामना होणारच! बीसीसीआय उपाध्यक्षांचे शिक्कामोर्तब

On: मंगळवार, ऑक्टोबर 19, 2021 3:34 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध सामना खेळणार आहेत. बीसीसीआय १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धेचे कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. २४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान दोन्ही पारंपारिक विरोधी संघ विश्वचषकातील आपला सामना खेळतील. गेल्या काही वर्षांपासून दोन्ही संघांमध्ये कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. त्याचवेळी आता विश्वचषकातील हा महत्त्वपूर्ण सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी समोर येत होती. त्यावर बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काय म्हणाले शुक्ला?

जम्मू-काश्मीरमधील नागरिकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत काँग्रेसचे नेते आणि बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटले आहे की, दहशतवादी कारवाया करणाऱ्या संघटना विरुद्ध कठोर कारवाई करायला हवी. शुक्ला म्हणाले, “आम्ही जम्मू -काश्मीरमध्ये झालेल्या हत्यांचा तीव्र निषेध करतो. दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. जिथपर्यंत भारत- पाकिस्तान टी२० सामन्याचा संबंध आहे, आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार, आपण कोणाविरुद्ध खेळण्यास नकार देऊ शकत नाही. आपल्याला आयसीसी स्पर्धांमध्ये खेळावेच लागेल.”

सामना रद्द करण्याची झाली होती मागणी

गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये नागरिकांना, विशेषत: स्थानिकांना लक्ष्य केले जात आहे आणि त्यांना मारले जात आहे. म्हणून बीसीसीआय आणि सरकारने आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याचा पुनर्विचार करावा अशी चर्चा जोर धरत होती.

भारत-पाकिस्तान एकाच गटात

आयसीसी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. गट १ मध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज याशिवाय दोन क्वालिफायर संघ असतील. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि दोन क्वालिफायर संघ गट २ मध्ये आपले सामने खेळतील. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडविरुद्ध, ०३ नोव्हेंबरला अफगाणिस्तानविरुद्ध. ५ नोव्हेंबरला आणि नंतर ८ नोव्हेंबरला भारताला दोन क्वालिफायर संघांसोबत खेळायचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---