आयपीएल २०२२ ची लीग स्टेज संपली. तब्बल पाच वर्षांनी हे देखील पहायला मिळाले की, चेन्नई आणि मुंबई व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीतरी संघाने आयपीएल ट्रॉफी उंचावली. जगातील सर्वात मोठ्या टी२० लीगच्या, या आजवरच्या सर्वात ग्रॅंड सीजनमध्ये पहिल्यांदाच खेळत असलेले अनेक युवा भारतीय क्रिकेटरही चमकले. आयपीएल ट्रॉफीवर जसे लिहिलेले असते, टॅलेंट मिट अपॉर्च्युनिटी. तशी संधी तिलक वर्मा, उमरान मलिक, अभिषेक शर्मा, मोहसिन खान यांनी साधली. या साऱ्यांनीच युवा असूनही आपापल्या संघासाठी सर्वोत्तम परफॉर्मन्स दिला. मात्र, त्याचवेळी आणखी काही टॅलेंटेड क्रिकेटर्स एका संधीची वाट पाहत राहिले. सीजनआधी त्यांच्या नावाची भरपूर चर्चा झाली, पण तरीही कोणास ठाऊक का त्यांना त्यांच्या फ्रॅंचाईजीने मैदानात उतरवले नाही. त्यापैकीच एक महाराष्ट्राचा राजवर्धन हंगारगेकर. चेन्नईच्या टीमचा भाग असलेला प्रतिभासंपन्न राजवर्धन एकदाही मैदानावर दिसला नाही. पण का?, याच कारणांचा मागोवा घेणारा हा लेख.
मागील वर्षाच्या शेवटी क्रिकेटचा अंडर नाईन्टीन आशिया कप खेळला गेला. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारीत वेस्ट इंडिजमध्ये अंडर नाईन्टीन वर्ल्डकप झाला. दोन्ही टूर्नामेंटची विजेता यंग इंडिया. यश धूल या दिल्लीच्या पोराच्या कॅप्टन्सीमध्ये या दोन्ही ट्रॉफी भारतात आल्या. या यशात महाराष्ट्राच्या तीन पोरांचा मोठा वाटा होता. स्पिनर विकी ओत्सवाल, ऑलराऊंडर कौशल तांबे आणि राजवर्धन हंगारगेकर. त्यातही सर्वात जास्त चर्चा झाली राजवर्धन हंगारगेकरचीच. सहा फुटांची उंची. अंगाने एकदम ॲथलिट. बॉलिंग करताना १४५+ स्पीड. टो क्रशिंग यॉर्कर व परफेक्ट बाउन्सर मारायची क्षमता. बॅटिंगला आल्यावर तर त्याच्या डोक्यात एकच, बॉल फक्त स्टॅण्डमध्ये मारायचा. तोच म्हणतो मी ग्राउंडवर आल्यावर सर्वात आधी पिच नव्हे तर, बाऊंड्री लाईन पाहतो. असा हा राजवर्धन.
अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमध्ये त्याने काय भन्नाट बॉलिंग केली असेल याचा अंदाज तुम्ही यावरूनच लावू शकता की, भारताच्या पहिल्या मॅचमध्ये कॉमेंट्री करणाऱ्या न्यूझीलंडच्या सायमन डूलने त्याचे कौतुक करताना म्हटले, “राजवर्धनचे बॉल म्हणजे जणू काही बंदुकीच्या गोळ्या.” इथूनच त्याला नाव पडले उस्मानाबाद एक्सप्रेस. त्याच्या बॉलिंग इतकीच एक्सायटींग वाटली त्याची बॅटिंग. त्याची बॅटिंग पाहताना मॅक्सवेलचा भास व्हावा, असा बॅट स्विंग. १० बॉल खेळलो तर पाच सिक्सच मारायचे अशी मेंटॅलिटी. वर्ल्डकप गाजवून आल्याने त्याच्यावर एका आठवड्याने होणाऱ्या आयपीएल लिलावात सर्वांची नजर होती. घडलेही तसेच. त्याच्यासाठी भिडल्या आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स. अखेर दीड कोटी रुपयांची बोली लावत चेन्नईने बाजी मारली. राजवर्धनची आवडती टीम खरंतर मुंबई. पण त्याच्या वडिलांची आवडती टीम चेन्नई. कोरोनाच्या काळात वडील गेले. कदाचित त्यांचीच इच्छा असावी म्हणून, मला चेन्नईत संधी मिळतेय याचं त्याला समाधान होतं.
हेही पाहा- एवढं कौतूक झालेल्या राजवर्धन हंगारगेकरला CSKने IPL 2022ला का टीमबाहेर ठेवलं?
सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक चार दिवसांनी एक घटना घडली. महाराष्ट्राचे क्रीडा व युवक विभाग आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी राजवर्धन वय लपवून खेळत असल्याचे म्हटले. तो १९ नसून २१ वर्षाचा असल्याचा आरोप केला. शेवटी राजवर्धनने सर्व पुरावे सादर करत आपण निर्दोष असल्याचे सिद्ध केले.
आता मंच होता आयपीएलचा. आयपीएल सुरू झाली आणि चेन्नईची गाडी व्यवस्थित रुळावर चढलीच नाही. टुर्नामेंटच्या अर्ध्यातूनच ते स्पर्धेतून बाहेरही व्हायला आलेले. राजवर्धनला अजून संधी का देईनात म्हणून अनेक जण प्रश्न विचारत होते. अशात एक दिवस राजवर्धन डगआउटमध्ये नव्हेतर, स्टँडमध्ये संघाला चिअर करताना दिसला. अनेकांना समजेनाच असं का घडत आहे? सीएसके अशीही यंग प्लेयरवर विश्वास ठेवण्यासाठी ओळखली जात नाही. खेळाडूला पूर्ण तयार करूनच ते ग्राऊंडमध्ये उतरवतात असा त्यांचा इतिहास. रविचंद्रन आश्विन, ऋतुराज गायकवाड ही त्याचीच उदाहरणे. दोघांनाही एक-एक सिझन पूर्णपणे बेंचवर काढावा लागल्यानंतर, आयपीएल मध्ये खेळायची संधी मिळाली होती. कदाचित असच काहीतरी असावं असं सर्वांना वाटलं.
शेवटी टुर्नामेंट बाहेर गेलेल्या सीएसकेची लास्ट मॅच आली. टॉसवेळी न राहवून इयान बिशप्सने धोनीला विचारलेच की, राजवर्धनला का खेळवले नाही. धोनीने क्लियर कट उत्तर दिले. “तो टॅलेंटेड आहे, युवा आहे. अंडर नाईन्टीनचे प्लेयर फर्स्ट क्लास क्रिकेट खेळून आलेले नसतात. त्यामुळे त्याच्याकडून नेटमध्ये बॉलिंग कोचेस आणि आम्ही सिनियर प्लेयर आणखी तयारी करून घेतोय. तो पुढच्या वर्षी दिसेल.” इन शॉर्ट कुंभार जसा भांडी बनवतो, आणि नंतर पक्के होण्यासाठी आगीत भाजतो, तशीच प्रोसेस सीएसके राजवर्धनसोबत करत आहे.
आता पुढचे वर्षभर राजवर्धन महाराष्ट्रासाठी रणजी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळेल. तीन महिने सीएसकेच्या दिग्गजांमध्ये वेळ घालवण्याचा किती फायदा त्याला झाला आहे लवकरच दिसून येईल. मात्र, त्याला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक वर्ष तरी वाट पाहावीच लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मिशेल आणि ब्लंडेल जोडीची विक्रमतोड भागीदारी, १८ वर्षांनंतर ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती
एका मिसळ पावच्या किंमती एवढं महाग श्रीलंका-ऑस्ट्रेलिया मॅचचं तिकीटं
पाकिस्तानला हरवत बक्षीस म्हणून मिळालेली ‘ऑडी १००’ पाहून शास्त्री भावूक, ३७ वर्षांनंतर पाहिली कार