पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजाने भारत-पाकिस्तान संघाच्या खेळाडूंचा मिळून आपला ड्रीम ११ संघ तयार केला आहे. विशेष गोष्ट ही आहे की, त्याने आपल्या संघात फक्त एका भारतीय गोलंदाजाला स्थान दिले आहे आणि तो गोलंदाज भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे हा आहे. Ramiz Raja India Pakistan Playing Xi Team.
भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांच्याशी फेसबुक लाइव्हवर बोलताना रमीजने त्याच्या ड्रीम ११ संघाविषयी सांगितले. तो म्हणाला की, “मी हा संघ निवडण्यासाठी माझ्या मुलाशी चर्चा केली होती. एवढ्या दिग्गज खेळाडूंपैकी काही खेळाडूंना निवडून संघ तयार करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. यावर माझ्या मुलाने मला पाकिस्तानच्या गोलंदाजांना आणि भारताच्या फलंदाजांना घेऊन संघ तयार करण्याचा सल्ला दिला होता.”
रमीजने त्याच्या संघात सलामीला फलंदाजी करण्यासाठी भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागसोबत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना निवडले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला संधी दिली आहे. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर आणि राहुल द्रविडला ५व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवडले आहे.
तर, रमीजने भारताचा यशस्वी कर्णधार एमएस धोनीला ६व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी ठेवले आहे. संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इमरान खानची निवड केली आहे आणि आपल्या संघाचे नेतृत्वपदही त्याने इमरानकडेच सोपवले आहे.
गोलंदाजीविषयी बोलायचे झाले तर रमीजने त्याच्या संघात फक्त अनिल कुंबळे या भारतीय गोलंदाजाला स्थान दिले आहे. तर, पाकिस्तानचा सकलेन मुश्ताक हा फिरकी गोलंदाजी करेल. तसेच, वसीम अक्रम आणि वकार युनिस हे वेगवान गोलंदाजी करतील.
रमीज राजाचा भारत-पाकिस्तान ड्रीम ११ संघ
विरेंद्र सेहवाग, सुनील गावसकर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, एमएस धोनी, इमरान खान (कर्णधार), वसीम अक्रम, वकार युनिस, अनिल कुंबळे, सकलेन मुश्ताक