भारतीय क्रिकेट संघाने नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिका विजय साजरा केला. अनुनभवी व युवा खेळाडूंना हाताशी धरत काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. त्यामुळे, भारतीय संघातील खेळाडूंसह भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे देखील सर्वजण कौतुक करत आहेत. आता, पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजा यांनी देखील शास्त्री यांचे अभिनंदन केले आहे.
शास्त्री यांचे मार्गदर्शन मोलाचे
पाकिस्तानचे माजी कर्णधार राहिलेले व सध्या समालोचक म्हणून काम करणारे रमीझ राजा युट्युबवरून क्रिकेटसंबंधी अनेक विषयांवर चर्चा करत असतात. राजा यांनी म्हटले की, “रवी शास्त्री यांना विजयाचे श्रेय देण्यास मला आवडेल. कारण, त्यांनी ३६ धावांवर बाद झालेल्या संघाचे मनोबल वाढवले. संघातील सुपरस्टार खेळाडू हजर नसतानाही त्यांनी ड्रेसिंग रूममध्ये असे वातावरण निर्माण केले की, तरुण खेळाडूंना आपण कोणापेक्षा कमी आहे, असे वाटू दिले नाही.”
इंग्लंडसाठी असेल मोठी परीक्षा
रमीझ राजा यांनी आगामी भारत-इंग्लंड मालिकेविषयी बोलताना म्हटले, “इंग्लंड संघ चांगल्या तयारीने भारतात आला आहे. श्रीलंकेत त्यांनी विजय मिळवला. मात्र, भारतात त्यांची परीक्षा होईल. भारतात अखेरच्या वेळी कसोटी मालिका जिंकणारा संघ इंग्लंडचाच आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीचे खेळाडूदेखील ऑस्ट्रेलियामध्ये राहिले आणि त्यांनी ऑस्ट्रेलियामधील दुसरी मालिका जिंकली. आता भारताचे मुख्य खेळाडू आणि विराट कोहली परतल्यानंतर तुम्ही संघाचा आत्मविश्वास कोणत्या पातळीवर असेल याची कल्पना करू शकता.”
भारताने जिंकली ऑस्ट्रेलियात सलग दुसरी मालिका
भारतीय क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारतीय संघाने प्रथम २०१८-२०१९ च्या दौऱ्यावर ही कामगिरी पहिल्यांदा केलेली. या वेळी भारतीय संघात नियमित कर्णधार विराट कोहली, अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांचा समावेश नव्हता.
महत्वाच्या बातम्या:
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवरील रोमहर्षक कसोटी सामने, एक तर सुटला होता बरोबरीत
आरंभ है प्रचंड! भारतीय संघाचे खेळाडू उतरले चेपॉकच्या मैदानात, पाहा फोटो
भारत आणि इंग्लंड संघातील असे ८ खेळाडू, ज्यांच्यात आहे एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता