भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ टी20 मालिका खेळत आहे. स्टार अष्टपैलू वेदा कृष्णमूर्ती या संघाचा भाग नाही. मात्र ती क्रिकेटप्रेमींमध्ये सध्या चर्चेत आहे. यामागचे कारण तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. वेदाला कर्नाटकचा रणजी क्रिकेटपटू अर्जुन होएसला याने फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज केले आहे. त्यांनी दोघांनी स्वत सोशल मीडियावर या खास क्षणाचे फोटो शेअर केले आहेत.
32 वर्षीय अर्जुनने (Arjun Hoysala) वेदाला (Veda Krishnamurthy) प्रपोज करण्यासाठी अतिशय रोमँटिक जागा निवडली आहे. त्याने पर्वतांच्या मध्ये सुंदर आणि नेत्रदीपक अशा ठिकाणी जाऊन तिला लग्नासाठी मागणी घातली आहे. हिंदी सिनेमांप्रमाणे गुडघ्यावर बसत त्याने वेदाला प्रपोज केले. यावर वेदानेही त्याला होकार दिला. यानंतर दोघांनी एकमेकांना अंगठी घातली.
अर्जुनने त्याच्या इंस्टग्राम अकाउंटवर या क्षणाचे बरेचसे फोटो शेअर केले आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘…आणि ती हो म्हणाली.’
फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसते की, अर्जुनने वेदाला प्रपोज केल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तिने अर्जुनला होकार दिल्यानंतर त्याने तिला मिठीदेखील मारली. यानंतर अर्जुन आणि वेदाच्या संघ सहकाऱ्यांनी दोघांना आयुष्यातील नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CiW7c0wL5Dp/?utm_source=ig_web_copy_link
वेदा आणि अर्जुन आहेत एका संघाचे
वेदा आणि अर्जुन दोघेही कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्त्व करतात. मात्र अर्जुनच्या तुलनेत वेदाची कारकिर्द यशस्वी राहिली आहे. वेदाने आतापर्यंत भारतीय महिला संघाकडून 76 टी20 सामने आणि 48 वनडे सामने खेळले आहेत. वनडेत तिने 41 डावात 829 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 63 डावात फलंदाजी करताना 875 धावा केल्या आहेत. वेदा सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तिने राष्ट्रमंडळ खेळ आणि टी20 विश्वचषकात समालोचन केले होते.
दुसरीकडे अर्जुनने कर्नाटक रणजी संघाकडून डिसेंबर 2016 मध्ये पदार्पण केले होते. तो कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये 10 सामने खेळला आहे.






