भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा अर्थात रणजी ट्रॉफीचा २०२१-२२ चा हंगाम संपायला आला आहे. बादफेरीतील सर्व सामने पार पडले असून उपांत्य फेरी सामन्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. बादफेरीतील रोमांचक लढतींनंतर अखेर ८ पैकी ४ संघांनी उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले आहे. बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मुंबई हे संघ आता अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी एकमेकांशी भिडताना दिसतील. तत्पूर्वी उपांत्य फेरी सामन्यांचे वेळापत्रक जाणून घेऊ…
जून ०६ ते १० दरम्यान ४ वेगवेगळ्या मैदानांवर रणजी ट्रॉफीचे बादफेरी (Ranji Trophy 2021-22) सामने झाले. सर्वप्रथम कर्नाटक विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यातील तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्याचा निकाल लागला. अलूर येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात उत्तर प्रदेशने कर्णधार करण शर्माच्या (नाबाद ९३ धावा) चिवट खेळीच्या जोरावर संघाला उपांत्य सामन्याचे तिकीट मिळवून दिले. त्यांचा उपांत्य सामन्यातील प्रतिस्पर्धी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्याच्या निकालावरून ठरला. बंगाल विरुद्ध झारखंड संघातील पहिला उपांत्यपूर्व सामना मनोज तिवारीच्या शतकी खेळीमुळे अनिर्णीत राहिला आणि बंगालने पहिल्या डावाच्या जोरावर उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुसरीकडे पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वातील मुंबई संघाने दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात उत्तराखंडविरुद्ध ७२५ धावांनी विश्वविक्रमी विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारली. तर चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात मध्यप्रदेशने पंजाबला १० विकेट्सने झुकवत उपांत्य फेरीत जागा बनवली. त्यामुळे उभय संघ अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दुसऱ्या उपांत्य सामन्यात आमनेसामने असतील.
उपांत्य फेरीचे वेळापत्रक (Ranji Trophy Semi Final Schedule)
उपांत्य फेरीचे सामने १४ ते १८ जूनदरम्यान खेळले जातील. अलूर येथे पहिला उपांत्य सामना होईल. या सामन्यात बंगाल आणि मध्य प्रदेश संघ आमने सामने असतील. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात लढत होईल. हा सामना बेंगलोरमध्ये खेळवला जाईल. या दोन्ही सामन्यांतील विजेते संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील.
कधी होणार अंतिम सामना?
रणजी ट्रॉफी २०२१-२२ हंगामाचा अंतिम सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर २२ ते २६ जून या कालावधीत खेळवला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, या सामन्यात दर्शकांना प्रवेश दिला जाणार नाही. अशात आता उपांत्य फेरीत सर्वोत्तम खेळ दाखवत कोणता संघ अंतिम फेरीचे तिकीट मिळवेल आणि कोणाच्या हाती निराशा लागेल, याकडे सर्वांची नजर असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मैदानामध्ये महिला पीत होती ‘बियर’, डेरिल मिशेलच्या षटकाराने तिला म्हटले ‘चीयर्स’