बेंगलोर। आज(28 जानेवारी) रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रने कर्नाटकला 5 विकेट्सने पराभूत करत तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी त्यांनी 2012-13 आणि 2015-16 ला रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
या सामन्यात कर्नाटकने दिलेल्या 279 धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्रकडून चेतेश्वर पुजारा आणि शेल्डन जॅक्सन यांनी शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.
पुजाराने सौराष्ट्राच्या दुसऱ्या डावात 266 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 131 धावा केल्या. तर जॅक्सनने 217 चेंडूत 100 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 15 चौकार मारले.
आज(28 जानेवारी) या सामन्याच्या पाचव्या दिवशी सौराष्ट्राला विजयासाठी फक्त 55 धावांची गरज होती. चौथ्या दिवसाखेर पुजारा 108 धावांवर आणि जॅक्सन 90 धावांवर नाबाद होता. या दोघांनी पाचव्या दिवसाची सुरुवात चांगली केली. पण कर्नाटकचा गोलंदाज विनय कुमारने 100 धावांवर असताना जॅक्सनला बाद केले.
यामुळे पुजारा आणि जॅक्सन यांची चौथ्या विकेटसाठीची 214 धावांची भागीदारी तूटली. परंतू त्यानंतर पुजाराने नाबाद राहत सौराष्ट्रचा विजय साकार केला.
या डावात कर्नाटककडून विनय कुमारने 3 विकेट्स घेतल्या. तर अभिमन्यू मिथून आणि रोनित मोरेने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 275 धावा केल्या होत्या. या डावात त्यांच्याकडून मनिष पांडे(62), श्रेयस गोपाळ(87) आणि श्रीनिवास शरथ(83*) यांनी अर्धशतके केली. या डावात सौराष्ट्रकडून कर्णधार जयदेव उनाडकटने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.
सौराष्ट्रला त्यांच्या पहिल्या डावात सर्वबाद 236 धावा करता आल्या. त्यामुळे ते 39 धावांची पिछाडीवर होते. या डावात सौराष्ट्रकडून स्नेल पटेलने 85 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर पुजाराने 45 आणि जॅक्सनने 46 धावांची छोटेखानी खेळी केली. या डावात कर्नाटककडून रोनित मोरेने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.
39 धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या कर्नाटकचा डाव 239 धावात उरकला. सौराष्ट्रकडून धर्मेंद्रसिंग जडेजाने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या आणि उनाडकटने 3 विकेट्स घेतल्या, तर कर्नाटककडून या डावात श्रेयस गोपाळने 61 धावांची अर्धशतकी खेळी केली.
आता 3 ते 7 फेब्रुवारी दरम्यान विदर्भा विरुद्ध सौराष्ट्र असा अंतिम सामना रंगणार आहे. गतविजेत्या विदर्भाने उपांत्य सामन्यात केरळचा 1 डाव आणि 11 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–हार्दिक पंड्या झाला सुपरमॅन, घेतला न्यूझीलंडच्या कर्णधाराचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ
–राफाची बारी? नाही नाही, जोकरच भारी!!
–नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा जिंकले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद