मागील आठवड्यात मोहाली येथे दिल्ली विरुद्ध पंजाब संघात रणजी करंडकातील चौथ्या फेरीचा सामना पार पडला. या सामन्यादरम्यान पंचांच्या निर्णयाला विरोध केल्याबद्दल भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलवर कारवाई करण्यात आली आहे.
त्याला सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्लीचा कर्णधार ध्रुव शोरलाही आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल सामना शुल्कापैकी 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
या सामन्याच्या पहिल्या तासात गिल आणि पंचामध्ये वाद झाल्याची घटना घडली होती. पंजाबचा फलंदाज गिलने त्याला बाद दिले म्हणून मैदानावरील पंच मोहम्मद रफी यांच्याशी वाद घातला होता.
त्यानंतर रफी यांनी मैदानावरील दुसरे पंच पश्चिम पाठक यांच्याशी चर्चा करुन त्यांचा निर्णय बदलून गिलला नाबाद दिले.
त्यामुळे दिल्लीच्या संघाने नाराजी व्यक्त केली होती. तसेच शोरेने मैदानाबाहेर जाण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे हा सामना काही वेळासाठी थांबला होता. अखेर सामनाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि मग सामना सुरु झाला.
याबद्दल बीसीसीआयचे सरव्यवस्थापक, क्रिकेट ऑपरेशन्स, सबा करीम यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (डीडीसीए) पाठवलेल्या पत्रात सांगितले की, ‘या सामन्यात मैदानावरील घोर गैरवर्तनाबद्दल आम्हाला सामनाधिकारी पी. रंगनाथन यांनी कळविले आहे.’
तसेच या पत्रात त्यांनी म्हटले आहे की “सामन्यादरम्यान खेलाडूवृत्तीच्या विरुद्ध वागून तुम्ही बीसीसीआयच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे ज्यासाठी तुम्हाला तुमच्या सामना शुल्कापैकी 50 टक्के दंड आकारला गेला आहे.”
त्याच सामन्याच्या दुसर्या डावात गिलने पुन्हा विकेटच्या मागे झेल गेल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळीही पंच रफी होते.




