सध्या अफगाणिस्तान क्रिकेट संघ संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या आशिया चषकात सहभागी झाला आहे. उद्घाटनाच्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत करत आपल्या आशिया चषक मोहिमेची विजयी सुरुवात केली. ब गटात त्यांचा दुसरा सामना बांगलादेश विरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संघाचा अनुभवी फिरकीपटू राशिद खान याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) काही मागण्या केल्या आहेत.
पहिल्या सामन्यात विजय मिळवलेला अफगाणिस्तान संघ मंगळवारी (30 ऑगस्ट) बांगलादेशविरुद्ध आपला दुसरा साखळी सामना खेळेल. हा सामना जिंकून सुपर फोरमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा मनसुबा असेल. या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राशिद खान हा पत्रकारांना सामोरा गेला. यावेळी बोलताना त्याने काही प्रमुख मुद्द्यांवर लक्ष वेधले. राशिद म्हणाला,
“आम्ही आणखी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू इच्छितो. जेणेकरून आमच्या युवा खेळाडूंना आणखी संधी मिळेल. आम्ही जगभरातील विविध लीगमध्ये खेळत असतो मात्र देशाचे प्रतिनिधित्व करणे केव्हाही अभिमानास्पद असते. मात्र, काही गोष्टी तुमच्या हातात नसतात.”
अफगाणिस्तान क्रिकेट संघाला 2018 मध्ये कसोटी संघाचा दर्जा मिळाला होता. तेव्हापासून त्यांनी काही हाताच्या बोटावर मोजण्याा इतपत कसोटी सामने खेळले आहेत. तसेच ते सलग दोनदा वनडे विश्वचषकासाठी देखील पात्र ठरलेत. श्रीलंकेविरुद्ध झालेला आशिया चषकातील पहिला सामना अफगाणिस्तानचा 100 वा टी20 सामना होता. तसेच ते 2012 पासून सातत्याने टी20 विश्वचषकासाठी पात्र होत आहेत. राशिद खानसह कर्णधार मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, झहीर खान, कैस अहमद यासारख्या अफगान खेळाडूंना जगभरातील टी20 लीगमध्ये मोठी मागणी आहे.