आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर१२ फेरीतील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत अफगानिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. स्कॉटलॅंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगानिस्तान संघाने १३० धावांनी विजय मिळवला होता. तर पुढील सामना शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात अफगानिस्तान संघाचा दिग्गज फिरकीपटू राशिद खानला मोठा विक्रम करण्याची संधी असणार आहे.
राशिद खानने जगभरातील अनेक मोठ मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने लक्षवेधी कामगिरी केली आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्याने चमकदार कामगिरी केली आहे. स्कॉटलॅंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ४ गडी बाद केले होते. तर पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो एक गडी बाद करताच टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बळी घेण्याच्या बाबतीत शतक पूर्ण करणार आहे.
राशिद खानने आतापर्यंत टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ९९ गडी बाद करण्यात यश आले आहे. या दरम्यान त्याने ४ वेळेस ४ गडी बाद करण्याचा आणि २ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. आता आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये १०० वा गडी बाद करताच तो असा कारनामा करणारा जगातील चौथा गोलंदाज ठरू शकतो. यापूर्वी असा पराक्रम लसिथ मलिंगा, शाकिब अल हसन आणि टीम साऊदीने केला आहे.
तसेच २३ वर्षीय राशिद खानकडे ५३ व्या सामन्यात १०० गडी बाद करण्याची संधी असणार आहे. टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० गडी बाद करण्याचा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावे आहे. लसिथ मलिंगाने हा कारनामा ७६ सामन्यात केला होता. तर शाकिब अल हसन आणि टीम साउदीने हा कारनामा त्यांच्या वैयक्तीत ८४ व्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात केला होता.
तसेच, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात जर राशिदला ४ गडी बाद करण्यात यश आले, तर तो टी२० क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याचा कारनामा करू शकतो. त्याने २८५ सामन्यात ३९६ गडी बाद केले आहेत. टी२० क्रिकेटमध्ये फक्त ३ गोलंदाज आहेत, ज्यांना ४०० पेक्षा अधिक गडी बाद करण्यात यश आले आहे. ड्वेन ब्रावोने सर्वाधिक ५५१, सुनील नरेनने ४२५ आणि इमरान ताहीर ४२० गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हरभजन सिंग म्हणतो, न्यूझीलंडविरुद्ध भारताने ‘या’ खेळाडूला द्यावे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर विराट कोहलीने केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून जडेजा झाला निराश