आशिया चषक 2022 मधील तिसरा सामना मंगळवारी (30 ऑगस्ट) शारजा येथे खेळला गेला. अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने सात गड्यांनी मोठा विजय मिळवत सुपर फोरमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला. या विजयानंतर अफगाणिस्तान संघाचा माजी कर्णधार असगर अफगाण याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
सामन्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना अफगाण म्हणाला,
“ड्रेसिंग रूममधील वातावरण अत्यंत शानदार आहे. सर्वांनी खूप जल्लोष केला असेल. राशिद पुन्हा एकदा सर्व संघाला पार्टी देईल. कारण, संघही जिंकला आहे आणि त्याची स्वतःची कामगिरीही जबरदस्त झाली. मोहम्मद शहजाद संघाचा भाग असता तर आणखी मजा आली असती.”
अनुभवी सलामीवीर शहजाद दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याने घेतलेला फलंदाजीचा निर्णय मुजीब उर रहमानने पूर्णतः चुकीचा ठरवला. त्याने शाकिबसह दोन्ही सलामीवीरांना 5.2 षटकात 24 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर राशिद खानने रहीमला बाद करत बांगलादेशची अवस्था आणखीनच खराब केली. त्यानंतरही कोणी फारशी मोठी खेळी करू शकले नाही. मोसद्देक हुसेन याने अखेरपर्यंत नाबाद राहत 31 चेंडूत 48 धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी मुजीब व राशीद यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले.
बांगलादेशने दिलेल्या 128 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. मागील सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केलेला गुरबाज लवकर बाद झाला. झझाई व इब्राहिम झादरान यांनी संयम दाखवत संघाची जास्त पडझड होऊ दिली नाही. झझाई व नबी थोड्या अंतराने बाद झाल्याने संघ संकटात सापडला होता. मात्र, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नजीब झादरानने केवळ 17 चेंडूवर 6 षटकार आणि 1 चौकार ठोकत नाबाद 43 धावा करून संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. सामनावीर पुरस्कार मुजीबला देण्यात आला. या विजयासह अफगाणिस्तान ब गटातून अव्वल राहत सुपर फोरमध्ये खेळताना दिसेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
जडेजाचं नाव घेत दिग्गज समालोचकाने उडवली मांजरेकरांची खिल्ली, वाचा सविस्तर
चमकदार विजयासह अंकित, रौनक, अभिनव मुख्य फेरीत
हॉंगकॉंगच्या गोलंदाजाने स्विकारलेय विराटला बाद करण्याचे चॅलेंज; चार वर्षांपूर्वी रोहित-धोनीला दाखवलेला तंबूचा रस्ता