मुंबई। रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सकडून 17 वर्षीय रसीक सलामने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या गोलंदाजीवर भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग प्रभावित झाला आहे. त्याने म्हटले आहे की रसीक हा पुढील 2-3 वर्षात खास खेळाडू बनेल.
यावर्षीच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा युवराज म्हणाला, ‘रसीकने नेटमध्ये चांगली स्विंग गोलंदाजी केली. त्याच्या शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार गेला. पण त्या व्यतिरिक्त त्याने चांगली गोलंदाजी केली.’
तसेच युवराजने सांगितले की ‘त्याने(रसीक) पहिल्या सामन्यात दबाव हताळताना चांगली कामगिरी केली. हा दबाव आंतरराष्ट्रीय सामन्याप्रमाणेच होता. मला वाटते पुढील 2-3 वर्षात तो विशिष्ट खेळाडू बनेल.’
जम्मू काश्मिरच्या असणाऱ्या रसीकची आयपीएलमध्ये सुरुवात नो बॉलने झाली. पण त्या चेंडूनंतर लगेचच रसीकने त्याच्या गोलंदाजीवर नियंत्रण ठेवत पुढचा फ्रि-हिटचा चेंडू बाउंसर टाकला. दिल्लीच्या फलंदाजाने फटकावलेला हा चेंडू मिडविकेटला असणाऱ्या क्षेत्रकक्षकाने झेलला. पण फ्रि -हिट असल्याने रसीकला विकेट मिळाली नाही.
त्याच्या गोलंदाजीचे कौतुक मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड यांनीही केले आहे. ते म्हणाले, ‘ही सुरुवात आव्हानात्मक होती, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे काहीवेळेस गोष्टी चूकीच्या होतात. रसीकने चांगली गोलंदाजी केली. तो आमच्या उत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याच्याकडे शिकण्याची भूक आहे.’
बॉन्डबरोबरच झहिर खाननेही रसीकबद्दल म्हटले आहे की ‘रोहित शर्माही रसीकला पाहुन प्रभावित झाला आहे. तो त्याला मोसमाच्या सुरुवातीलाच संधी देण्याच्या विचारात आहे.’
रसीकने दिल्ली विरुद्ध 4 षटके गोलंदाजी करताना 42 धावा दिल्या होत्या. मात्र त्याला विकेट घेण्यात अपयश आले.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रविवारी झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना रिषभ पंतच्या नाबाद 78 धावांच्या जोरावर 213 धावा केल्या होत्या.
प्रतिउत्तरादाखल मुंबईला 176 धावाच करता आल्या. मुंबईकडून युवराजने अर्धशतकी खेळी करताना 35 चेंडूत 53 धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार मारले होते. मुंबईच्या डावातील ही सर्वोच्च खेळी होती.
महत्त्वाच्या बातम्या-
–भर मैदानात इशांत, रबाडाचे वाॅटसनबरोबर झाले वाद, या खेळाडूने केली मध्यस्थी
–‘कमॉन पापा’ म्हणत कॅप्टन कूल धोनीला चिअर करणाऱ्या झिवाचा व्हिडीओ व्हायरल
–आयपीएल सामन्यादरम्यान चौकीदार चोर हैं घोषणांनी स्टेडियम दणाणले





