पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सहाव्या दिवशी दुसऱ्या सामन्यात सत्यजीत बच्छाव(४-२४ व नाबाद १७) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने ४एस पुणेरी बाप्पा संघाचा ४ गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जेट्सकडून सत्यजीत बच्छाव(४-२४), विजय पावले(२-२५), प्रदीप दाढे(१-१८), योगेश चव्हाण(१-२६)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे ४ एस पुणेरी बाप्पा संघाचा डाव १९.४ षटकात सर्वबाद १४५धावांवर संपुष्टात आला. पुणेरी बाप्पा संघाने आज सलामीच्या जोडीत बदल केला होता. पण तो यशस्वी ठरला नाही. नील गांधी ७ धावात तंबूत परतला. पवन शहाने आक्रमक खेळी करत १९चेंडूत ५चौकारांसह ३२धावा, तर यश क्षीरसागरने २९चेंडूत २४धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २८चेंडूत ४२धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. हे दोघेही बाद झाल्यावर कर्णधार ऋतुराज गायकवाडने १५चेंडूत १चौकार व १षटकाराच्या मदतीने २९धावा काढून संघाची धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. पण ऋतुराज दुसरी धाव घेत असताना निखिल नाईकने त्याला बाद केले व पुणेरी बाप्पा संघाला मोठा धक्का दिला. त्यानंतर राहुल देसाई १६, सचिन भोसलेच्या २२धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही.
याच्या उत्तरात रत्नागिरी जेट्स संघाने १९.४षटकात ६बाद १४८धावा करून पूर्ण केले. क्रिश शहापूरकर(१३धावा) व धीरज फटांगरे(२५धावा) या सलामीच्या जोडीने ३२चेंडूत ३५धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीचे फलदांज बाद झाल्यावर कर्णधार अझीम काझीने २८चेंडूत २चौकाराच्या मदतीने ३१धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. पण रोशन वाघसरेने प्रीतम पाटील(६धावा), अझीम काझी(३१धावा) यांना बाद करून सामन्यातील रोमांच वाढवला. त्यावेळी रत्नागिरी जेट्स ५बाद ९१धावा अशा स्थितीत होता. रत्नागिरी जेट्सला विजयासाठी ३० चेंडूत ५४ धावांची आवश्यकता होती. निखिल नाईकने २२चेंडूत ३चौकारांसह नाबाद २८धावांची खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला योगेश चव्हाणने ७चेंडूत २चौकार व १षटकारासह १७धावांची तडाखेबंद खेळी करून साथ दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी १५चेंडूत २९ धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. योगेश चव्हाणला सोहम जमालेने एक आक्रमक फटका मारताना झेल बाद करून सामन्यातील उत्सुकता वाढवली. त्यानंतर सत्यजीत बच्छावने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही कमाल दाखवत ६चेंडूत नाबाद १६धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. यात त्याने २चौकार व १षटकार मारले. पुणेरी बाप्पाकडून पियुश साळवी(२-१९), रोशन वाघसरे(२-१५)यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
४एस पुणेरी बाप्पा: १९.४ षटकात सर्वबाद १४५धावा(पवन शहा ३२(१९,५x४), ऋतुराज गायकवाड २९, यश क्षीरसागर २४, सचिन भोसले २२, राहुल देसाई १६, सत्यजीत बच्छाव ४-२४, विजय पावले २-२५, प्रदीप दाढे १-१८, योगेश चव्हाण १-२६) पराभुत वि.रत्नागिरी जेट्स: १९.४षटकात ६बाद १४८धावा(अझीम काझी ३१(२८,२x४), निखिल नाईक नाबाद २४, धीरज फटांगरे २५, योगेश चव्हाण १७, सत्यजीत बच्छाव नाबाद १७, पियुश साळवी २-१९, रोशन वाघसरे २-१५, सचिन भोसले १-१५, सोहम जमाले १-४०); सामनावीर – सत्यजीत बच्छाव.