अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ मध्ये मंगळवारी(२८ सप्टेंबर) डबल हेडरचे सामने (एकाच दिवशी दोन सामने) रंगले. या दिवशी दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. या सामन्यात मुंबईने ६ विकेट्सने विजय मिळवला. मात्र, मुंबईचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादवच्या नावावर एक नकोसा विक्रम झाला आहे.
या सामन्यात पंजाबने मुंबईला १३६ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईकडून सूर्यकुमार यादव चौथ्या षटकात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला. पण, त्याला त्याच्या पहिल्याच चेंडूवर रवी बिश्नोईने त्रिफळाचीत करत माघारी धाडले. त्याला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
सूर्यकुमार गोल्डन डकवर बाद (पहिलाच चेंडू खेळताना बाद) होण्याची ही आयपीएलमधील तिसरी वेळ ठरली. यापूर्वी तो २०१५ आणि २०१८ साली गोल्डन डकवर बाद झाला आहे. २०१५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळताना सूर्यकुमार ख्रिस मॉरिसविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. तर, २०१८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना सूर्यकुमारला त्याच्याच नाही तर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या उमेश यादवने त्रिफळाचीत केले होते.
मुंबईचा विजय
सूर्यकुमार खास काही करता आले नसले, तरी मुंबईने मंगळवारी ६ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांच्या युएईमध्ये आयपीएल २०२१ चा पहिलाच विजय ठरला. १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक ४५ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने ३० चेंडूत नाबाद ४० धावा केल्या. तसेच क्विंटन डी कॉकने २७ धावांची छोटेखानी खेळी केली. पंजाबकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी पंजाबकडून एडेन मार्करमने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. मार्करमने दीपक हुडासह ६१ धावांची भागीदारी केली. हुडाने २८ धावा केल्या. तसेच केएल राहुलने २१ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे पंजाबला २० षटकांत ६ बाद १३५ धावाच करता आल्या होत्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पंड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
सेहवागला पछाडत पंतच्या दिल्लीसाठी सर्वाधिक धावा; तर इतर संघांसाठी ‘हे’ खेळाडू आहेत ‘रनमशीन’