भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं झिम्बाब्वेवर 23 सहज विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं 20 षटकांत 4 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, झिम्बाब्वेचा संघ 6 गडी गमावून 159 धावाच करू शकला.
या सामन्यात भारताचा युवा गोलंदाज रवी बिश्नोई यानं एक अप्रतिम झेल घेतला. त्याचा हा झेल पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रवी बिश्नोईनं झिम्बाब्वेच्या डावाच्या चौथ्या षटकात हा झेल घेतला. भारताकडून वेगवान गोलंदाज आवेश खान हे षटक टाकत होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर झिम्बाब्वेचा फलंदाज ब्रायन बेनेटनं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या रवी बिश्नोईनं चेंडू हवेत जाताना पाहून अखेरच्या क्षणी हवेत उंच उडी घेत चेंडू पकडला.
आपल्या या शानदार क्षेत्ररक्षणानं बिश्नोईनं चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू जॉन्टी रोड्सची आठवण करून दिली. रोड्स त्याच्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध होता. रवी बिश्नोईनं हवेत उडी मारून अशाप्रकारे झेल घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी आयपीएल 2024 मध्येही त्यानं एक असाच झेल पकडला होता. बिश्नोईची फिल्डिंग पाहून मैदानावरील सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. भारतीय खेळाडूंनीही त्याच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणाचं कौतुक केलं होतं.
A RAVI BISHNOI STUNNER CATCH. 🤯pic.twitter.com/cyAh7BEFp2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 10, 2024
झिम्बाब्वे दौऱ्यात रवी बिश्नोईनं आपल्या क्षेत्ररक्षणासोबतच गोलंदाजीनंही सर्वांना प्रभावित केलं आहे. बिश्नोईनं झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चेंडूनं चमकदार कामगिरी करत 4 बळी घेतले. त्यानं आपल्या स्पेलमध्ये केवळ 13 धावा दिल्या. दुसऱ्या सामन्यातही रवी बिश्नोईची धारदार गोलंदाजी कायम राहिली. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यानं 2 फलंदाज बाद केले. दुसऱ्या टी20 सामन्यात बिश्नोईनं केवळ 11 धावा दिल्या होत्या. मात्र तिसऱ्या सामन्यात तो फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. त्यानं 4 षटकांच्या स्पलमध्ये 37 धावा दिल्या, मात्र एकही विकेट मिळाली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
युवा खेळाडूंचा दबदबा! तिसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला सहज धूळ चारली; मालिकेत आघाडी
4 कसोटी… 774 धावा… हेल्मेटशिवाय फलंदाजी करणारा दिग्गज झाला 75 वर्षांचा! ‘हा’ विश्वविक्रम 5 दशकांपासून कायम
प्रथम टीम इंडियासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली, त्यानंतर न खेळवताच बाहेर करण्यात आले हे 2 युवा खेळाडू