वेस्ट इंडीज येथे नुकताच एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक (U19 Cricket World Cup West Indies 2022) खेळला गेला. यश धूल (Yash Dhull) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. भारताचे हे या स्पर्धेतील पाचवे विजेतेपद आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय संघाने अप्रतिम खेळ केला. डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमार (Ravi Kumar) याने या स्पर्धेत भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व केले. बाद फेरीच्या सामन्यांमध्ये त्याचा खेळ अधिक खुलून आला. अंतिम सामन्यातही त्याने घातक गोलंदाजी करत ४ बळी आपल्या नावे केले. त्यानंतर आता त्याने माजी भारतीय कर्णधार व दिग्गज फलंदाज विराट कोहलीबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. (Ravi Kumar On Virat Kohli)
रवी कुमारची शानदार गोलंदाजी
एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात बंगालचा डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने धारदार गोलंदाजी करत भारतासाठी सर्वाधिक १० बळी मिळवले. अंतिम सामन्यातही त्याने ४ बळी घेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या प्रदर्शनाचे बक्षीस म्हणून त्याला आगामी रणजी ट्रॉफीसाठी बंगाल संघामध्ये स्थान दिले गेले आहे.
विराटबाबत केला खुलासा
रवी कुमारने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. यामध्ये त्याने विराट कोहली सोबतच्या संभाषणातील एक किस्सा सांगितला. रवी कुमारने म्हटले,
“अंतिम सामन्यापूर्वी जेव्हा सर्व संघाचे विराटसोबत संभाषण झाले तेव्हा त्याला मी प्रश्न विचारला की, तुमची कमजोरी काय आहे? यावर त्याने उत्तर दिले की, तू आत्ताच मला बाद करायचे ट्रेनिंग घेतोय का?”
एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहली याने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारताच्या युवा संघाशी संवाद साधलेला. यामध्ये त्याने खेळाडूंना प्रेरित करत त्यांना शुभेच्छा दिल्या. विराटच्या नेतृत्वात भारताच्या युवा संघाने २००८ मध्ये एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक जिंकला होता.
महत्वाच्या बातम्या-






