Ravi Shastri Advice To Hardik Pandya :- भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या श्रीलंकेविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत आहे. सध्या तो चांगल्या फिटनेसमध्ये असला तरी, त्याच्या तंदुरुस्तीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करताना भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला एक सल्ला दिला आहे.
शास्त्री भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असताना हार्दिक त्यांच्या आवडत्या खेळाडूंपैकी एक होता. मात्र, तो सातत्याने दुखापतग्रस्त होत असतो. त्याच्या याच फिटनेसचे कारण देत त्याला भारतीय संघाचा नवा टी20 कर्णधार बनवले गेले नाही. याच मुद्द्यावर शास्त्री यांना एका मुलाखतीत विचारले असता ते म्हणाले, “मला वाटते की हार्दिक याने फिट राहण्यासाठी जास्तीत जास्त सामने खेळावे. त्याने कमीत कमी टी20 क्रिकेटला तरी नाही म्हणू नये. जिथे सामने असतील तिथे त्याने नक्कीच भाग घ्यावा.”
ते पुढे म्हणाले, “हार्दिकच्या प्रतिभेवर कोणालाही शंका नाही. मात्र, तो दुखापतग्रस्त राहिल्यास त्याच्यावर टीका होते. नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात त्याने योग्य वेळी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. यामुळे त्याचा स्वतःचा आत्मविश्वास देखील वाढला असेल. त्याने आता अधिकाधिक लक्ष फिटनेसवर द्यावे. तसेच वनडे क्रिकेटमध्ये कमीत कमी सात ते आठ षटके टाकावी. हे त्याच्या कारकिर्दीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.”
टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघाचा पुढील टी20 कर्णधार म्हणून हार्दिक याचे नाव चर्चेत होते. मात्र, सूर्यकुमार यादव याला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले. भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना याविषयी विचारले असता, त्यांनी हार्दिकच्या तंदुरुस्तीचे कारण पुढे केले होते. तसेच, त्याच्याकडून संघाचे उपकर्णधारपद देखील काढून घेतले आहे. सध्या श्रीलंका दौऱ्यावर तो केवळ खेळाडू म्हणून सहभागी झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाबाहेर असलेल्या पृथ्वीचा इंग्लंडमध्ये जबरदस्त ‘शो’, केवळ इतक्या चेंडूत फटकावल्या 76 धावा
पॅरिस ऑलिम्पिक: अर्जुन बबुताचा निशाना थोडक्यात चुकला..! एअर रायफलमध्ये गमावलं पदक
“गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला…” माजी भारतीय खेळाडूचा मोठा दावा