आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत भारतीय संघाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जेतेपदाचे स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला सुपर१२ मधून बाहेर व्हावे लागले आहे. गेल्या ४ वर्षांपासून मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत संपला आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांना आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकून देता आली नाही. परंतु, त्यांनी भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवले आहे. आता त्यांचा कार्यकाळ संपला आहे, तर एक नजर टाकुया त्यांच्या वक्तव्यांवर जे भरपूर चर्चेत आले होते.
रवी शास्त्री यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते की, कर्णधार हा संघाचा मुख्य असेल. विराट कोहली सोबत ४ वर्ष काम करत असताना त्यांनी अनेकदा हे म्हटले की, “कर्णधार हा संघाचा बॉस असेल, हे माझे म्हणणे आहे.”
तसेच २०१८ मध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत जेव्हा भारतीय संघ पराभूत झाला होता, त्यावेळी रवी शास्त्री यांचे म्हणणे होते की, हा कुठल्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करणारा संघ आहे. त्यावेळी त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. रवी शास्त्री यांनी म्हटले होते की, “जर तुम्ही गेल्या ३ वर्षांचा इतिहास पाहिला तर, आम्ही परदेशात ९ सामने आणि ३ मालिका जिंकल्या आहेत. गेल्या १५ -२० वर्षात मला हाच एक असा संघ दिसतोय, ज्याने कमी वेळात चांगली कामगिरी केली आहे.”
भारतीय संघ जेव्हा मायदेशात चांगली कामगिरी करत असतो, त्यावेळी खेळपट्टीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतात. २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर देखील हा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यावेळी रवी शास्त्री यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, “खेळपट्टीला सामन्याच्या मध्ये आणू नका. उडत गेली खेळपट्टी. २० गडी बाद करा. जोहान्सबर्ग असो किंवा दिल्ली, मुंबई असो की ऑकलंड किंवा असो मेलबर्न.”
शेवटी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत नामिबिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. या सामन्यानंतर त्यांनी म्हटले की, “आयुष्यात कधी कधी हे महत्वाचं नसतं की, तुम्ही काय मिळवलं आहे. महत्वाचं हे असतं की तुम्ही कुठल्या परिस्थितीत विजय मिळवला आहे. गेल्या ५ वर्षात या खेळाडूंनी जे करून दाखवलं आहे, प्रत्येक स्वरूपात चांगली कामगिरी केली आहे. टी२० विश्वचषक स्पर्धेत जे झालं असलं, तरीदेखील हा संघ सर्वश्रेष्ठ संघ असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२२ साठी आरसीबीने केली मुख्य प्रशिक्षकाची घोषणा; विजेतेपद जिंकण्याचा केला निर्धार
“२०१९ विश्वचषकात शास्त्रींना जाणवली होती रायुडूची कमतरता”