भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टर कसोटी रद्द झाल्यापासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. इंग्रजी माध्यमे, ईसीबी आणि अगदी भारतीय क्रिकेट चाहतेही यासाठी शास्त्रींना दोष देत आहेत. मात्र, आता शास्त्रींनी यावर आपले मौन तोडले आणि आपल्यावरील आरोप फेटाळले. भारतीय संघातील कोरोना प्रकरणांचा आपल्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राशी खास बातचीत करताना ते म्हणाले की,
“माझ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाने कोरोना प्रकरणे समोर आली असे म्हणता येणार नाही. कारण, संपूर्ण युनायटेड किंगडम खुले आहे. पहिल्या कसोटीनंतर काहीही होऊ शकले असते. अशा परिस्थितीत, पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात उपस्थित राहिल्यामुळे सर्वांना संसर्ग झाला आणि कसोटी रद्द करावी लागली, असे म्हणता येणार नाही.
शास्त्रींनी केले होते स्वतःच्या पुस्तकाचे प्रकाशन
रवी शास्त्री यांनी लिहिलेल्या ‘स्टार गोजींग: द प्लेयर्स इन माय लाईफ इन लंडन’ या पुस्तकाचे प्रकाशन १ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या समारंभासाठी संपूर्ण भारतीय दल हजर होते. त्यानंतर, चौथी कसोटी ओव्हल येथे खेळली गेली. या कसोटीच्या चौथ्या दिवशी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर व संघाचे फिजिओ नितीन पटेल यांना विलगीकरणात ठेवले गेलेले.
पाचवी कसोटी झाली रद्द
पाचव्या कसोटीआधी भारतीय संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार हेदेखील कोरोना बाधित आढळून आले होते. त्यामुळे, अखेरची कसोटी खेळली जाणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली होती. सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी नकारात्मक आल्यानंतर कसोटी सुरू होईल अशी आशा व्यक्त केली गेली. मात्र, भारतीय खेळाडूंनी संभाव्य धोका न पत्करता कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आमने-सामने आले आहेत.