भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधर यांचा करार २०२१ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. पुढील काळात, रवी शास्त्री आणि त्यांचे सहकारी आयपीएल संघात सहभागी होऊ शकतात, अशी बातमी आहे. सध्या त्यांचे नाव अहमदाबाद या आयपीएल संघाशी जोडले जात आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, अहमदाबाद फ्रँचायझी मालक सीव्हीसी कॅपिटल्सने यूएईमध्ये रवी शास्त्री, भरत अरुण आणि आर श्रीधर यांच्याशी संपर्क साधला आहे. असे म्हटले जात आहे की, शास्त्री यांनी २०२१ टी२० विश्वचषक पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. सध्या रवी शास्त्री हे भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत, तर भरत अरुण गोलंदाजी आणि श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. टी२० विश्वचषकानंतर राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार आहे.
यापूर्वी असे बोलले जात होते की, भारतीय संघांपासून वेगळे झाल्यानंतर रवी शास्त्री पुन्हा समालोचन करताना दिसणार आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते समालोचनात सक्रिय होते आणि या क्षेत्रात त्यांचे मोठे नाव होते. २० वर्षे ते या क्षेत्रात सक्रिय होते, पण २०१४ पासून एक वर्ष वगळता ते भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिले आहेत. रवी शास्त्री २०१६ मध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. यानंतर त्यांना समालोचन सोडावे लागले होते. आता रवी शास्त्री समालोचनाऐवजी आयपीएलमध्ये कोचिंगची नोकरी निवडू शकतात, असे बोलले जात आहे. तथापि, रवी शास्त्री आणि अहमदाबाद फ्रँचायझी या दोघांकडून अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.
आयपीएलमध्ये कोचिंगची जबाबदारी सांभाळताना रवी शास्त्री समालोचनाचे कामही करू शकतात. सध्या व्हीव्हीएस लक्ष्मणही त्याच पद्धतीने सक्रिय आहे. तो सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक आहे आणि स्टार स्पोर्ट्ससाठी समालोचनही करतो. अनेक प्रसारकांनी रवी शास्त्री यांच्याशी संपर्क साधल्याचे समजते. यामध्ये स्टारसोबत सोनीचेही नाव आहे.
सीव्हीसी कॅपिटल्सने अहमदाबाद फ्रँचायझीसाठी ५६०० कोटी रुपयांची बोली लावली होती. या फर्मचे जगातील इतर अनेक क्रीडा लीगमधील संघ आहेत. असे म्हटले जात आहे की, अहमदाबाद फ्रँचायझी मेगा लिलावापूर्वी संघ तयार करण्यासाठी सर्व तयारी करू इच्छित आहे. यासाठी तिला लवकरात लवकर सपोर्ट स्टाफची निवड करायची आहे. जेणेकरून खेळाडूंची निवड करणे सोपे होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हा’ भारतीय फलंदाज मोडतो विरोधकांचे कंबरडे; माजी पाकिस्तानी दिग्गजाने गायले गोडवे
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”