यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेली आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सामन्यांना लवकरच प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत देखील प्रवेश करता आला नाही. सुपर -१२ फेरीत भारतीय संघाने नामिबिया संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला. हा सामना विराट कोहलीचा टी२० संघाचा कर्णधार म्हणून तर रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना ठरला. रवी शास्त्री यांनी प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून जे जे काही केले आहे ते पाहून सर्वच खुश आहेत. अनेकांनी आपले मत देखील मांडले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी देखील रवी शास्त्री यांचे ट्विट करत कौतुक केले आहे.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया संघाला २ वेळेस त्यांच्याच देशात जाऊन पराभूत केले. तर मार्च महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध मालिका ३-२ ने आपल्या नावावर देखील केली होती. वसीम जाफरने याबाबत ट्विट करताना म्हटले की, “विश्वचषकासाठी तुम्ही त्यांच्यावर टीका करू शकता, पण जेव्हा कसोटी क्रिकेटचा प्रश्न येतो, त्यावेळी भारतीय संघाने अशी कामगिरी केली आहे, जसे काय डॉक्टरांनी आदेश दिले असावे. हा संघ ट्रेसर बुलेटप्रमाणे प्रगती करत परदेशात धोकादायक संघ बनला. रवी भाई आणि संघाने स्तर उंचावला आहे आणि सर्वजण कौतुकास पात्र आहेत.”
तसेच विराट कोहलीनंतर भारतीय टी २० संघाचा कर्णधार कोण याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना रवी शास्त्री यांनी म्हटले की, “मला असे वाटते की, रोहित शर्माच्या स्वरूपात तुम्हाला एक योग्य खेळाडू मिळाला आहे. त्याने अनेकदा आयपीएल स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे आणि तो संघाचा उपकर्णधार देखील आहे. तो ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी तयार आहे. आमचा टी२० संघ एक मजबूत संघ आहे. आम्ही विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवण्यात अपयशी ठरलो असलो तरी देखील आमचा संघ एक मजबूत संघ राहील. कारण आयपीएल स्पर्धेतून उत्कृष्ट खेळाडू बाहेर येत असतात. राहुल द्रविड आता आपल्या हिशोबाने संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतील.”
तसेच आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरी बद्दल बोलताना ते म्हणाले की, “सध्या खेळाडू मागील सहा महिन्यापासून बायो-बबलमध्ये आहेत. मला वाटते की, आयपीएल आणि विश्वचषक यांच्यादरम्यान आणखी कालावधी हवा होता. आयसीसीने पुढील काळातील गांभीर्याने या गोष्टीचा विचार करायला हवा.” रवी शास्त्री हे २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते.