भारतीय संघाने नुकतेच एशिया कपचे सातवे विजेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेदरम्यान भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
पण आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी एशिया कप 2018 स्पर्धेत विराटला विश्रांती देण्यामागील कारण सांगितले आहे.
त्यांनी गल्फ न्यूजशी बोलताना सांगितले की ‘ विराटला विश्रांतीची गरज होती. विराटकडे अफाट शक्ती आहे. तूम्ही त्याला मैदानापासून जास्त काळ दूर ठेऊ शकत नाही.’
‘विराट जेव्हाही खेळतो, तेव्हा तूम्हाला माहित आहे की तो कोणत्या स्थराचे सामर्थ्य बरोबर आणतो. त्यामुळे विराटच्या विश्रांती बाबतीत फक्त मानसिक थकवा हे कारण होते. या विश्रांतीमुळे त्याचे मन क्रिकेटमधून दुसरीकडे वळेल आणि त्यानंतर तो पुन्हा ताजातवाना होऊन मैदानात परतेल.’
तसेच त्यांनी पुढे सांगितले की ‘आम्ही ही गोष्ट अन्य खेळाडूंबरोबरही करणार आहोत. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनाही आम्हाला फिट आणि उत्साही ठेवायचे आहे.’
बुमराह आणि भुवनेश्वरला 4 आॅक्टोबर पासून भारताच्या विंडिज विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर या मालिकेतून विराट भारतीय संघात परतणार असून त्याची कर्णधारपदाची धूरा पुन्हा हाती घेणार आहे.
भारत विंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे खेळणार आहे.
विंडिज विरुद्धच्या दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघातून सलामीवीर फलंदाज शिखर धवनला वगळण्यात आले आहे. तर मुरली विजयलाही 15 जणांच्या संघात स्थान दिलेले नाही.
त्यांच्या ऐवजी सलामीवीर फलंदाज म्हणून युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवालला संधी देण्यात आली आहे.
तसेच इंग्लंड दौऱ्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात संधी मिळालेल्या हनुमा विहारीनेही त्याच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे विंडिज विरुद्ध त्याला 15 जणांच्या भारतीय संघामध्ये संधी मिळाली आहे.
याबरोबरच दिनेश कार्तिक आणि करुण नायर यांनाही विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडिया आता खेळणार दिवस-रात्र कसोटी सामना
–शाहीद आफ्रिदी पुन्हा दिसणार क्रिकेट खेळताना
–एशिया कप गाजवणारा राशिद खान म्हणतो, केवळ या गोष्टीमुळे मिळाले यश