भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या प्रतिष्ठेच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 ला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघ विजय मिळवून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करू शकतो. ऍशेसनंतर सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जात असलेल्या या कसोटी मालिकेसाठी आता समालोचकांची देखील यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांची नावे दिसून येत आहेत.
चार सामन्यांच्या या मालिकेसाठी नुकतीच प्रसारण वाहिनीकडून समालोचकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीमध्ये आणखी नावांची देखील भर पडू शकते. मात्र, आतापर्यंत करारबद्ध झालेल्या समालोचकांमध्ये रवी शास्त्री, सुनील गावसकर, हर्षा भोगले, मुरली कार्तिक, संजय मांजरेकर, मॅथ्यू हेडन व अजित आगरकर यांचा समावेश आहे. तसेच अद्याप निवृत्त न झालेला मात्र भारतीय संघातून जवळपास बाहेर असलेला अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा देखील या मालिकेतून भारतात समालोचन क्षेत्रातील पदार्पण करेल.
कार्तिक याने यापूर्वी 2021 मध्ये द हंड्रेड या इंग्लंडमधील लीगमध्ये तसेच भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटीत देखील समालोचन केले होते. मात्र, त्यानंतर त्याने पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केल्याने तो या क्षेत्रापासून दूर गेलेला.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चार सामन्यांच्या या मालिकेला नागपूर येथे 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना दिल्ली, तिसरा सामना धर्मशाला व अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जाईल. सध्या भारतीय क्रिकेट संघाकडे बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आहे. भारताने 2020-2021 मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ही मालिका आपल्या नावे केली होती.
(Ravi Shastri Sunil Gavaskar Dinesh Karthik Commenter In Border Gavaskar Trophy 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये पास झाला पठ्ठ्या