भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन सध्या पत्नी आणि दोन्ही मुलींसोबत हेडिंग्लेमध्ये आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात बुधवारीपासून (25 ऑगस्ट) लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर तिसरा कसोटी सामना खेळला जाईल. भारताच्या सध्याच्या इंग्लंड दौऱ्यात क्रिकेटपटूंना कुटुंबातील सदस्यांना सोबत आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा एक लांबचा आणि मोठा दौरा असल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला होता.
दरम्यान अश्विनची पत्नी प्रीती नारायणनने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक छोटी क्लिप शेअर केली आहे, ज्यात त्यांच्या मुली हॉटेलमध्ये मजा करताना दिसत आहेत. अश्विनच्या मुली हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये जमिनीवर कुस्ती खेळताना दिसत आहेत. प्रीती नारायणनने या स्टोरीवर लिहिले आहे की, ‘रेसलिंग राउंड 3.’
अश्विनला सध्याच्या कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. पहिल्या दोन कसोटींमध्ये अश्विन बाहेर बसला. कारण, भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू अशी रणनीती घेऊन मैदानात उतरला होता. या दोन्ही सामन्यात एकमेव फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजाला जागा मिळाली होती. रवींद्र जडेजाने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे आता अश्विनला जागा मिळणे थोडे अवघड झाले होते. मात्र जर हेडिंग्लेची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असेल तर अश्विनला तिसऱ्या कसोटीत संधी मिळू शकते.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला विराट कोहलीने अश्विनला निवडण्याचे वक्तव्य केलेले नाही. मात्र, त्याने अश्विनचा समावेश होण्याची शक्यताही नाकारलेली नाही. भारतीय कर्णधाराने खुलासा केला की, तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवर अधिक गवत पाहून त्याला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही.
कोहली म्हणाला, “संघ व्यवस्थापन बुधवारी संघ निवडीवर निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचे चांगले मूल्यांकन करेल. येथील खेळपट्टी पाहून आम्हाला फार आश्चर्य वाटलेले नाही. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी थोडी चांगली मदत करेल अशी अपेक्षा राहील. मला वाटले होते की खेळपट्टीवर आणखी गवत असेल. त्यामुळे अश्विनचा संघात समावेश करण्याबाबत आम्ही शक्यता नाकारत नाही. आम्ही नेहमी बारा खेळाडूंची नावे घेतो. सामन्याच्या दिवशी आम्ही खेळपट्टी बघून योग्य तो निर्णय घेऊ.”
महत्त्वाच्या बातम्या-
लॉर्ड्स कसोटी जिंकत WTC गुणतालिकेत भारताचे वर्चस्व, अव्वलस्थानी केला ताबा; इंग्लंड संघ मात्र घसरला
ना धोनी ना अजून कोणी; भारतीय कसोटी इतिहासात ‘हा’ विक्रम करणारा यष्टीरक्षक पंत असेल पहिलाच
फलंदाजीस पोषक हेडिंग्ले मैदानावर कोहलीकडे २३००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी, गरज आहे फक्त…