भारतीय कसोटी संघाने २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर घडवलेला इतिहासा विसरणे कोणत्याही चाहत्यासाठी सोपे नाही. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने या मालिकेत संघाचे नेतृत्व केले आणि पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकली. मालिकेतील शेवटचा सामना गाबा स्टेडियमवर खेळला गेला होता. आता दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या सामन्याविषयी काही महत्वाचे खुलासे केले आहेत.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) देखील या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघासोबत होता. भारताला शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे योगदान महत्वाचे होते. अश्विनने खुलासा केला की, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) हा सामना अनिर्णित करण्याच्या विचारात होते. संघ एका टप्प्यावर येऊन संभ्रमात पडला होता की, सामना अनिर्णित करण्यासाठी खेळावे की, जिंकण्यासाठी. मात्र, कर्णधार अजिंक्य रहाणेने पंतला त्याचा खेळ खेळू दिला आणि परिणामी संघाने हा ऐतिहासिक विजय मिळवला.
एका वृत्तसंस्थेशी बोलताना अश्विन म्हणाला की, “हे समजून घेणे खूप कठीण होते की, त्याच्या (रिषभ पंत) डोक्यात काय चालले आहे. तो काहीही करू शकतो. त्याच्याकडे एवढा आत्मविश्वास आहे की, त्याने विचार केला, तर प्रत्येक चेंडूवर षटकार मारू शकतो. कधी-कधी त्याला शांत ठेवणे अवघड होऊन बसते. सिडनीमध्ये पुजाराने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचे शतक हुकले.”
“या कसोटी (गाबा कसोटी) सामन्याला रवी शास्त्री अनिर्णित करू इच्छित होते. कारण, आम्ही असे करू शकत होतो. मी अजिंक्य रहाणेला विचारले की, आपण जिंकण्यासाठी खेळत आहोत का? त्यावर तो म्हणाला की, तो (पंत) स्वतःचा खेळ खेळत आहे. आपण पुढे काय होते ते पाहू,” असेही अश्विनने मुलाखतीत सांगितले.
Victory scenes at the Gabba.#AUSvIND pic.twitter.com/Z5nB9MyPwh
— BCCI (@BCCI) January 19, 2021