हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखील मुंबई इंडियन्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स सोमवारी (1 एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात जर राजस्थानचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला खेळण्याची संधी मिळाली, तर तो महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मासोबत आयपीएलच्या एका खास लिस्टमध्ये शामिल होईल.
आर अश्विनला आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत राजस्थानसाठी दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तो आयपीएलमध्ये आतापर्यंत 199 सामने खेळला आहे. जर त्याला आज मुंबई विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली, तर तो आयपीएलमध्ये 200 सामने खेळणारा 10 वा खेळाडू बनेल.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड एमएस धोनीच्या नावे आहे. धोनीनं आतापर्यंत 253 सामने खेळले आहेत. रोहित शर्मा 245 सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या स्थानी दिनेश कार्तिक असून, त्यानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 245 सामने खेळले आहेत. याशिवाय विराट कोहली (240), शिखर धवन (220), सुरेश रैना (205), रॉबिन उथप्पा (205) आणि अंबाती रायुडू (203) हे अन्य खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत.
आर अश्विननं 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. आतापर्यंत स्पर्धेत त्यानं 172 बळी घेतले आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 28.88 आणि इकॉनॉमी रेट 7.04 एवढा राहिला. 34 धावा देऊन 4 बळी ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
अश्विन गोलंदाजीसह त्याच्या टीमसाठी उपयुक्त फलंदाजही आहे. आयपीएलमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 743 धावा निघाल्या आहेत. अश्विन सध्या राजस्थानचा प्रमुख गोलंदाज आहे. राजस्थानसाठी आतापर्यंत खेळलेल्या 32 सामन्यांमध्ये त्यानं 27 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्यानं या दरम्यान 287 धावाही ठोकल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या सामन्यात त्यानं 19 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीनं 29 धावा हाणल्या. आता मुंबईविरुद्ध संधी मिळाल्यानंतर अश्विन कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचं लक्ष्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
महेंद्रसिंह धोनीची ऐतिहासिक कामगिरी!…टी20 क्रिकेटमध्ये आजपर्यंत असं कोणीही करू शकलं नाही
IPL 2024 दरम्यान बीसीसीआयनं अचानक बोलावली सर्व फ्रँचायझी मालकांची बैठक, काय आहे अजेंडा?