चेन्नई सुपर किंग्सनं लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात रवींद्र जडेजाला चौथ्या क्रमांकावर बढती दिली. त्या सामन्यात त्यानं 40 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. लखनऊविरुद्धच्या पुढच्या सामन्यातही जडेजा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या सामन्यात त्यानं 19 चेंडूत 16 धावा केल्या. या दोन्ही सामन्यात चेन्नईचा पराभव झाला. यानंतर आता प्रश्न उभा राहतो की, रवींद्र जडेजाला बढती देऊन सीएसकेला काही फायदा होत आहे का? शिवाय यामुळे जडेजाचं तर नुकसान नाही होतंय ना? टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून हे चांगलं आहे का? तर या सर्वांचं उत्तर नाही असंच मिळेल.
गेल्या सामन्यात जडेजानं चौथ्या क्रमांकावर येऊन अर्धशतक झळकावलं असलं तरी त्याचा संघाला फायदा झाला का? तर नाही. चेन्नईकडे शिवम दुबेसारखा हिटर आहे, परंतु संघ व्यवस्थापनाचा तर्क आहे की ते पॉवरप्लेमध्ये शिवम दुबेला मैदानात उतरवणार नाहीत. पॉवरप्लेमध्ये दोन विकेट पडल्या तर रवींद्र जडेजाला बढती दिली जाईल, असं कर्णधार ऋतुराज गायकवाडनं सांगितलं आहे. आता येथे प्रश्न उभा राहतो की, पॉवरप्लेचा शेवटचा ओव्हर चालू असताना शिवम दुबे बॅटिंगला का येऊ शकत नाही? गेल्या सामन्यात तो नक्कीच बाद झाला होता, मात्र या सामन्यात त्यानं दमदार फलंदाजी केली.
बॅटिंग ऑर्डरमधील या बढतीचा जडेजाला वैयक्तिकरित्या फायदा होतोय का? हा दुसरा प्रश्न आहे. निव्वळ आकडेवारी पाहिली तर त्याच्या खात्यात काही धावा जमा होत आहेत, कारण त्याला खेळण्यासाठी भरपूर चेंडू मिळत आहेत. मात्र जडेजाचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिल्यास दिसून येतं की तो शेवटच्या षटकांचा फलंदाज म्हणून जास्त ओळखला जातो. स्पष्टच बोलायचं झालं तर जडेजा एक मॅच फिनिशर आहे, खेळपट्टीवर टिकून राहणारा फलंदाज नाही. अशा परिस्थितीत एक खेळाडू म्हणूनही त्याचं नुकसान होत आहे.
चेन्नईनं रवींद्र जडेजाला वरच्या क्रमांकावर बढती दिल्यानं भारतीय संघाचंही नुकसान होऊ शकतं. कारण टीम इंडियामध्ये जडेजा गेल्या बराच काळापासून फिनिशरची भूमिका बजावत आहे. आता जर तो वरच्या किंवा मधल्या फळीत खेळायला आला तर त्याच्या फलंदाजीची शैली बदलेल. सर्व काही सुरळीत राहिलं तर 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी जडेजाची निवड जवळपास निश्चित आहे. तेथे त्याला 7व्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागले. तेव्हा तो मॅच फिनिशरच्या भूमिकेत असेल. अशा स्थितीत आयपीएलमध्ये त्यानं तयारी न केल्यास यामुळे भारतीय संघाचंच नुकसान होऊ शकतं.
महत्त्वाच्या बातम्या –
चेपॉकमध्ये लखनऊच्या एका चाहत्यानं केली चेन्नईच्या लाखो चाहत्यांची बोलती बंद; व्हिडिओ खूपच व्हायरल
मार्कस स्टॉयनिसनं केलं चेन्नईला शांत! सीएसकेचा घरच्या मैदानावर 6 गडी राखून पराभव
चेन्नईचा वाघ, ऋतुराज गायकवाड! लखनऊच्या गोलंदाजांना धो-धो धुतलं, घरच्या मैदानावर ठोकलं झंझावाती शतक