मुंबई। सोमवारी इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामाच्या १२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सला ४५ धावांनी पराभूत केले. चेन्नईचा हा या हंगामातील दुसरा विजय आहे. चेन्नईच्या या विजयात अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला. त्याने क्षेत्ररक्षण करताना ४ झेल घेतले. याबरोबरच त्याने खास विक्रमही केला आहे.
जडेजाने घेतले चार झेल
जडेजाने या सामन्यात चेन्नई संघ १८८ धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजीला उतरला असताना तब्बल ४ झेल घेतले. त्याने पहिला झेल चौथ्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर डीप मिड-विकेटला मनन वोहराचा घेतला.
त्यानंतर त्याने १५ व्या षटकात मोईन अली गोलंदाजी करत असताना डीप मिड-विकेटलाच रियान पराग आणि ख्रिस मॉरिस यांचा षटकाच्या पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर झेल घेतला. यानंतर चौथा झेल त्याने अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असताना जयदेव उनाडकटचा डीप बॅकवर्ड पाँइंटला क्षेत्ररक्षण करताना घेतला.
चार झेल घेणारा जडेजा ७ वा क्रिकेटपटू
एकाच आयपीएल सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून (यष्टीरक्षक वगळता) ४ झेल घेणारा जडेजा हा एकूण ७ वा क्रिकेटपटू आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये एका सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून ४ झेल सचिन तेंडुलकर, डेव्हिड वॉर्नर, जॅक कॅलिस, राहुल तेवातिया, डेव्हिड मिलर आणि डेव्हिड मिलर यांनी घेतले आहेत.
आयपीएलमध्ये एकाच सामन्यात क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारे क्रिकेटपटू
४ झेल – सचिन तेंडुलकर (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २००८)
४ झेल – डेव्हिज वॉर्नर (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०१०)
४ झेल – जॅक कॅलिस (विरुद्ध डेक्कन चॅर्जर्स, २०११)
४ झेल – राहुल तेवातिया (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१९)
४ झेल – डेव्हिड मिलर (विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१९)
४ झेल – फाफ डू प्लेसिस (विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०१९)
४ झेल – रविंद्र जडेजा (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २०२१)
गोलंदाजीतही जडेजाचे योगदान
जडेजाने केवळ क्षेत्ररक्षण करतानाच नाही तर गोलंदाजीतही कमाल केली. त्याने १२ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर त्याने ४९ धावांवर खेळणाऱ्या बटलरला त्रिफळाचीत केले. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने दुबेला १७ धावांवर पायचीत केले. त्यामुळे चेन्नईने या सामन्यात पुनरागमन केले. हे षटक चेन्नईसाठी फार महत्त्वाचे ठरले. त्यानंतर राजस्थानचे फलंदाज नियमित कालांतराने बाद होत गेले आणि राजस्थानला २० षटकाअखेर ९ बाद १४३ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईने हा सामना ४५ धावांनी सहज जिंकला.
चेन्नईकडून गोलंदाजीत जडेजा व्यतिरिक्त मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच सॅम करनने २ विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा एकदा स्टंप्समागून धोनीची कॉमेंट्री, पाहा गमतीदार व्हिडिओ
नाद नाही करायचा! दोन विकेट्स चार झेल घेतल्यानंतर रविंद्र जडेजाचे हटके सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
बॅट सोड आधी धावा काढ! बॅट उडाली हवेत तरीही दोन धावा पळाला ब्रावो, पाहा गमतीशीर व्हिडिओ