सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेली इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा दिमाखात पार पडत आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक खेळाडू शानदार कामगिरी करत आहेत. यामध्ये नव्या आणि जुन्या अशा सर्व खेळाडूंचा समावेश आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा हादेखील शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नाव सामील करण्यात यशस्वी ठरत आहे. जडेजासाठी आयपीएल 2023 स्पर्धेचा हंगाम शानदार ठरत आहे. तो फक्त विकेट्स घेत नाहीये, तर फलंदाजांना हैराण करत तंबूचा रस्ताही दाखवत आहे. याचे ताजे उदाहरण लखनऊ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्यात पाहायला मिळाले.
आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील 45वा सामना लखनऊच्या इकाना स्टेडिअमवर पार पडला. मात्र, पावसामुळे हा सामना पूर्ण षटकेही खेळला जाऊ शकला नाही. या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) याने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लखनऊ संघ फलंदाजीला आल्यानंतर डावातील 7व्या षटकात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) गोलंदाजी करण्यास आला. या जडेजाने पहिल्याच षटकात आयपीएलमधील सर्वोत्तम चेंडू टाकत विकेट घेतली.
नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊ संघाने पॉवरप्लेमध्ये 6 षटकात फक्त 34 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर जडेजा त्याचे पहिले षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने पहिल्या 4 चेंडूंवर फक्त 3 धावा खर्च केल्या. त्यानंतर 5व्या चेंडूवर असे काही झाले, ज्याला आयपीएलचा सर्वोत्तम चेंडू (Best ball of IPL) म्हटले जाऊ लागले. जडेजाचा हा चेंडू लेग स्टंपच्या दिशेने पडला, जो फलंदाजी करत असलेल्या मार्कस स्टॉयनिस याने लेग स्टंपच्या रेषेत खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्याला चकवत चेंडू ऑफ स्टंपवर जाऊन लागला. स्टॉयनिस यावेळी 6 धावा करून बाद झाला.
जडेजाचा हा चेंडू खूपच वळला, ज्याने स्टॉयनिसच्या स्टंपचा वेध घेतला. स्टॉयनिस त्रिफळाचीत झाल्यानंतर हैराण झाला आणि त्याला विश्वासच बसला नाही की, तो त्रिफळाचीत बाद झाला आहे. त्यामुळे तो बराच वेळ त्याच्या जागेवरच उभा राहिला. तसेच, विचार करू लागला की, तो नक्की बाद झाला तरी कसा. सोशल मीडियावर आता जडेजाच्या या चेंडूला आयपीएल 2023मधील सर्वोत्तम चेंडू म्हटले जात आहे. इतकेच नाही, तर काही चाहते जडेजाच्या या चेंडूची तुलना शेन वॉर्नच्या बॉल ऑफ सेंच्युरीशी करत आहेत.
या हंगामातील जडेजाच्या कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तो सातत्याने कहर कामगिरी करत आहे. त्याने 10 सामन्यातील 10 डावात आतापर्यंत 14 विकेट्स नावावर केल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट हा 7.17 इतका आहे. तो या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा सहावा गोलंदाज आहे. तसेच, तुषार देशपांडे हा चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. त्याने 17 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र, रवींद्र जडेजाला बॅटमधून खास योगदान देता येत नाहीये. (Ravindra jadeja bowled the best ball of the season pitched legside legstump and timbered the off stump)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हरभजन सिंगची मोठी भविष्यवाणी! ‘हे’ चार संघ करतील प्ले-ऑफमध्ये एन्ट्री, मुंबईचाही समावेश
धवनचा सल्ला घेत रोहितसेनेने पंजाबला त्यांच्याच मैदानात चारली धूळ; टॉसवेळी झालेल्या चर्चेचं भांडं फुटलं






