मुंबई। सोमवारी (१९ एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील १२ वा सामना पार पडला. हा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ४५ धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात रविंद्र जडेजाने गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात दरम्यान कामगिरी करत महत्त्वाचे योगदान दिले. यावेळी या सामन्यात त्याचे अनोखे सेलिब्रेशनही पाहायला मिळाले.
एकाच षटकात जडेजाच्या २ विकेट्स
चेन्नईने राजस्थान विजयासाठी १८९ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने ४५ धावांवर २ विकेट्स गमावल्यानंतर सलामीवीर जोस बटलरने शिवम दुबेला साथीला घेत संघाचा डाव सावरला होता. ही जोडी चेन्नईसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत होते.
मात्र, यावेळी जडेजा चेन्नईच्या मदतीला धावून आला. त्याने १२ व्या षटकात गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतला आणि या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने ४९ धावांवर खेळणाऱ्या बटलरला त्रिफळाची केले. त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने दुबेला १७ धावांवर पायचीत केले. हे षटक चेन्नईसाठी फार महत्त्वाचे ठरले. त्यानंतर राजस्थानचे फलंदाज नियमित कालांतराने बाद होत गेले आणि राजस्थानला २० षटकाअखेर ९ बाद १४३ धावाच करता आल्या.
क्षेत्ररक्षणातही चमकला जडेजा
जडेजाने केवळ गोलंदाजी करताच नाही तर क्षेत्ररक्षणातही मोलाची कामगिरी बजावली. त्याने या सामन्यात चेन्नई संघ गोलंदाजीसाठी उतरला असताना तब्बल ४ झेल घेतले. त्याने पहिला झेल चौथ्या षटकात सॅम करनच्या गोलंदाजीवर डीप मिड-विकेटला मनन वोहराचा घेतला.
त्यानंतर त्याने १५ व्या षटकात मोईन अली गोलंदाजी करत असताना डीप मिड-विकेटलाच रियान पराग आणि ख्रिस मॉरिस यांचा षटकाच्या पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर झेल घेतला. यानंतर चौथा झेल त्याने अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असताना जयदेव उनाडकटचा झेल डीप बॅकवर्ड पाँइंटला क्षेत्ररक्षण करताना घेतला.
जडेजाचे अनोखे सेलिब्रेशन
अखेरच्या षटकात उनाडकटचा झेल घेताच जडेजाने अनोखे सेलिब्रेशन केले. त्याने हाताची चार बोटं दाखवत चौथा झेल घेतला असल्याचे सांगितले. तसेच यानंतर त्याने कानावर फोन करत असल्यासारखी कृती केली. त्याच्या या हटके सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
A resounding victory for @ChennaiIPL against #RR by 45 runs.
4 fine catches and 2 wickets for @imjadeja 👏👏#VIVOIPL pic.twitter.com/xMtP2v2elL
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2021
चेन्नईने जिंकला सामना
या सामन्याच प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने २० षटकात ९ बाद १८८ धावा केल्या आणि राजस्थानला १८९ धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईकडून फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. त्याच्यापाठोपाठ अंबाती रायडूने २७ आणि मोईन अलीने २६ धावांची आक्रमक खेळी केली. तसेच ड्वेन ब्रावोने नाबाद २० धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.
राजस्थानकडून चेतन सकारियाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस मॉरिसने २ विकेट्स घेतल्या. तर राहुल तेवातिया आणि मुस्कफिजून रेहमान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानकडून जोस बटलर ४९ धावांची खेळी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अन्य फलंदाजांकडून अपेक्षेनुसार साथ मिळाली नाही. राजस्थानकडून त्याच्याव्यतिरिक्त राहुल तेवतिया (२०) आणि जयेदव उनाडकट (२४) यांनाच २० धावांचा आकडा पार करता आला.
चेन्नईकडून मोईन अलीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा आणि सॅम करनने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर शार्दुल ठाकूरने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
बॅट सोड आधी धावा काढ! बॅट उडाली हवेत तरीही दोन धावा पळाला ब्रावो, पाहा गमतीशीर व्हिडिओ
सॅल्यूट माही! टी२० क्रिकेटमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा एकमेवाद्वितीय कर्णधार बनला धोनी
चौदा वर्षात कोणाला न जमलेला ‘हा’ विक्रम धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने करून दाखवला