आयपीएल 2024 च्या 22व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं घातक गोलंदाजी केली. केकेआर विरुद्धच्या या सामन्यात सीएसकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जडेजानं या सामन्यात 3 बळी घेतले. याशिवाय क्षेत्ररक्षण करताना त्यानं दोन उत्कृष्ट झेलही घेतले. यासह जडेजानं आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण केले आहेत. जडेजाच्या आधी अशी कामगिरी विराट कोहली, सुरेश रैना, किरॉन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांनीच केली आहे.
रवींद्र जडेजानं केकेआरविरुद्ध दोन फलंदाजांचे झेल घेतले. जडेजानं आधी तुषार देशपांडेच्या चेंडूवर सलामीवीर फिल सॉल्टचा झेल घेतला. त्याला खातंही उघडता आलं नाही. यानंतर त्यानं मुस्तफिजूर रहमानच्या चेंडूवर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरचा झेल घेतला. अय्यरनं 32 चेंडूत 34 धावा केल्या. हे दोन झेल घेताच जडेजानं आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण केले. त्यानं याबाबतीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक
110 – विराट कोहली
109 – सुरेश रैना
103 – किरॉन पोलार्ड
100 – रोहित शर्मा
100 – रवींद्र जडेजा
98 – शिखर धवन
केकेआरविरुद्ध रवींद्र जडेजानं 4 षटकांत 18 धावा देत 3 बळी घेतले. या सामन्यात जडेजानं सुनील नारायण, अंगक्रिश रघुवंशी आणि व्यंकटेश अय्यरला बाद केलं. आयपीएलमध्ये त्यानं आतापर्यंत 16 वेळा एका सामन्यात 3 बळी घेतले आहेत. याबाबतीत त्यानं उमेश यादव आणि राशिद खान यांची बरोबरी केली. या दोघांनीही आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 वेळा एका सामन्यात तीन विकेट घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक वेळा 3 बळी घेणारे गोलंदाज
20 – युजवेंद्र चहल
20 – जसप्रीत बुमराह
19 – लसिथ मलिंगा
17 – अमित मिश्रा
16 – ड्वेन ब्राव्हो
16 – उमेश यादव
16 – राशिद खान
16 – रवींद्र जडेजा
या सामन्यात रवींद्र जडेजानं एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलमध्ये आतापर्यंत असं कोणताही खेळाडू करू शकलेला नाही. रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये 1000 पेक्षा अधिक धावा, 100 पेक्षा अधिक बळी आणि 100 पेक्षा अधिक झेल घेणारा पहिला खेळाडू बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-