बंगळूरू। भारताने अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव २६२ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयात भारताच्या गोलंदाजांचा मोठा वाटा आहे.
अफगाणिस्तानचा दुसरा डाव १०३ धावात संपुष्टात आणण्यासाठी फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने मोलाचा वाटा उचलला. त्याने ९ षटकात १७ धावा देत ४ फलंदाज बाद केले. याबरोबरच त्याने एक खास कामगिरी केली.
जडेजाने दोन्ही डावात रशीद खान आणि मुजीब उर रहमान या दोन फलंदाजांना बाद केले. एकाच दिवशी दोन फलंदाजांना दोनदा बाद करणारा जडेजा भारताचा दुसराच गोलंदाज ठरला आहे.
अशी कामगिरी या आधी भारताचे माजी गोलंदाज विनू मांकड यांनी केली आहे. त्यांनी ६६ वर्षांपूर्वी म्हणजे १९५२ साली १६-१८ आॅक्टोबर दरम्यान पाकिस्तानविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात केली होती. ही कामगिरी त्यांनी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी केली.
विशेष म्हणजे पाकिस्तानचाही तो पदार्पणाचा कसोटी सामना होता आणि भारतानेही पाकिस्तानला या सामन्यात फॉलोआन दिला होता.
जडेजाने या कसोटी सामन्यात एकूण ३५ धावा देत ६ विकेट घेतल्या आहेत. या सामन्यात जडेजा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला.