भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनाने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. आयसीसी क्रमवारीत अव्व्ल स्थानी असलेल्या भारताच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूला एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.
दुसऱ्या कसोटीमध्ये सामनावीर ठरलेल्या जडेजाला धोकादायकपणे चेंडू फेकल्यामुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे तो पल्लेकेलच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. तसेच तिसऱ्या कसोटी दरम्यान होणाऱ्या संघाच्या कोणत्याही क्रियाकलापमध्ये तो भाग घेऊ शकणार नाही.
त्यामुळेच संघ व्यवस्थापनाने त्याला पुन्हा भारतात येण्यासाठी परवानगी दिली आहे. २० ऑगस्ट पासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी जडेजा पुन्हा संघाबरोबर सामील होईल.
नक्की झाले काय ?
कोलंबोमधील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या डावात जेव्हा श्रीलंका फलंदाजी करत होती तेव्हा जडेजाची गोलंदाजी सुरु होती. करूणारत्नेने रक्षात्मक फटका मारून चेंडू जडेजाकडे ढकलला, जडेजाने तो चेंडू उचलून करुणारत्नेच्या दिशेने फेकला. करूणारत्ने लगेचच बाजूला झाला आणि यष्टीरक्षक सहाने चेंडू पकडला. करूणारत्ने क्रीझमध्ये असूनही जडेजाने चेंडू फेकला हे मैदानावरील पंच रॉड टकर आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड बघितले. यामुळेच जडेजाच्या नावावर गैरवर्तनाचे ३ गुण लावण्यात आले आणि आयसीसीच्या नियमानुसार ६ गुण झाल्यानंतर खेळाडूला १ सामन्याची बंदी घालण्यात येते.