मुंबई । लॉकडाऊनमुळे भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू हे घरातच गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ नजरकैदेत आहेत. त्यापैकी काही खेळाडूंनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे वळवला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहे तर काही खेळाडू लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या लोकांना मदत करण्यात व्यस्त आहेत. याच दरम्यान, भारताचा फिरकीपटू रवींद्र जडेजा मात्र आजकाल गुजरातमधील त्याच्या फार्महाऊसवर राहून दिवस काढत आहे.
रवींद्र जडेजाला घोडा हा प्राणी खूप आवडतो. त्याच्या फार्महाऊसवरच्या तबेल्यात एकापेक्षा एक जातिवंत घोडे पाहायला मिळतात. लॉकडाऊनच्या काळात तो या घोड्यांची काळजी घेताना दिसून येतोय. त्याला घोडेस्वारीचा खूप शौक आहे. मंगळवारी रवींद्र जडेजाने घोडेस्वारीचा आनंद लुटत असतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. कच्च्या रस्त्यांवर पांढरा शुभ्र घोडा वेगात धावत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
https://www.instagram.com/p/CA73HL7DL1Q/
घोड्याच्या पाठीवर काठी न बांधताच तो घोडस्वारी करत आहे. काठी न बांधताच घोडस्वारी करणे अवघड काम मानले जाते. मात्र, रवींद्र जडेजासाठी हे देखील त्याच्या डाव्या हाताचा खेळ आहे.
जडेजा क्रिकेटमध्ये शतक अथवा एखादा सुंदर फटका मारला की त्याची बॅट तलवारीसारखी फिरवतो. म्हणून त्याला तलवारबाज असे देखील म्हणतात. काही दिवसांपूर्वी एका क्रिकेट फॅन्सने असाच एक ‘सीन’त्याला मागितला होता. तेव्हा जडेजाने भारतीय संघाची जर्सी घालून आपल्या फार्महाऊसवर ही ‘सीन’ पुन्हा करून दाखवला.