भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात मोहालीच्या मैदानावर सध्या पहिला कसोटी (First Test) सामना सुरू आहे. या सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेच्या गोलंदाजांचा दबदबा दिसत असतानाच भारतीय फलंदाजांनी मोठ्या खेळी करत सामन्यात पुनरागमन केले आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत शतकापासून हुकल्यानंतर अष्टपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने खालच्या फळीत दीडशतक (Ravindra Jadeja 175 Runs) केले. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ५७४ धावा फलकावर लावत डाव घोषित केला.
खालच्या फळीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने हे दीडशतक केले असून, यासह एक खास विक्रमही (Ravindra Jadeja’s New Record) आपल्या नावावर केला आहे. या विक्रमात त्याने माजी भारतीय दिग्गज कपिल देव (Kapil Dev) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांना मागे टाकले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाला १७० धावांवर ३ झटके बसले होते. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने ताबडतोब ९६ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यानंतर पुढे जडेजाने किल्ला लढवला. त्याने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद १७५ धावांची शानदार खेळी केली. २२८ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने त्याने ही खेळी केली. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली आहे.
तसेच या खेळीसह तो मोठ्या विक्रमातही अव्वल बनला आहे. तो जेव्हा कसोटी सामन्यात भारतीय संघाने ५०० पेक्षा जास्त धावा केल्या असताना, सातव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च वैयक्तिक खेळी करणारा पहिलाच फलंदाज बनला आहे. या विक्रमांत त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना मागे टाकले आहे. कपिल देव यांनी १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्धच खालच्या फळीत १६३ धावांची खेळी केली होती. तर पंतने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५९ धावांची खेळी करत या यादीत जागा मिळवली होती.
भारतीय संघाने कसोटी सामन्यात ५००+ धावा केल्या असताना सातव्या किंवा त्याखालच्या क्रमांकावर फलंदाजीची सर्वोच्च वैयक्तिक खेळी-
१७५ धावा- रविंद्र जडेजा वि. श्रीलंका (२०२२)
१६३ धावा- कपिल देव वि. श्रीलंका (१९८६)
१५९ धावा- रिषभ पंत वि. ऑस्ट्रेलिया (२०१९)
१४४ धावा- एमएस धोनी वि. वेस्ट इंडिज (२०११)
१३२ धावा- एमएस धोनी वि. दक्षिण आफ्रिका (२०१०)
महत्त्वाच्या बातम्या-
मोहाली कसोटी : रविंद्र जडेजाचे शानदार शतक, रचले विक्रमांचे मनोरे; हटके सेलिब्रेशन चर्चेत
PAK vs AUS: पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीचा फोटो पाहून युझर्सनी केली थेट रस्त्याशी तुलना, पाहा मीम्स