टीम इंडियानं गुरुवारी (20 जून) झालेल्या टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 सामन्यात अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव केला. या टी20 विश्वचषकात भारतीय संघाचा हा चौथा विजय आहे. मात्र टीम इंडियाचा एक खेळाडू असा आहे, जो या विश्वचषकात 4 सामने खेळूनही काही खास कामगिरी करू शकला नाही. या खेळाडूनं 4 सामन्यांत फक्त 7 धावा केल्या आणि फक्त एक विकेट घेतली आहे. हा आहे टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा!
रवींद्र जडेजाला या टी20 विश्वचषकातील 4 सामन्यांमध्ये दोनदा फलंदाजीची संधी मिळाली आहे. तो 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, मात्र तो पहिल्याच चेंडूवर खातं न उघडता बाद झाला. आयर्लंड आणि अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात जडेजाला फलंदाजीची संधी मिळाली नाही. गुरुवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात जडेजा अवघ्या 7 धावा करून बाद झाला.
गोलंदाजीत रवींद्र जडेजाला आयर्लंड विरुद्धच्या सलामीच्या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. मात्र त्यानं केवळ एक षटकच गोलंदाजी केली होती. यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जडेजानं 2 षटकं टाकताना 10 धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. अमेरिका विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं त्याला एकही षटक टाकण्याची संधी दिली नाही. आता अफगाणिस्तान विरुद्धच्या सुपर-8 सामन्यात त्यानं आपलं बळींचं खातं उघडलं.
टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवण्यासाठी मजबूत स्पर्धा आहे. युजवेंद्र चहल सारखा फिरकीपटू आणि यशस्वी जयस्वालसारखा आक्रमक सलामीवीर सध्या बेंचवर बसून आहेत. त्यांना या विश्वचषकात एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे जर आगामी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला चांगली कामगिरी करता आली नाही, तर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
पंत, जडेजा, अर्शदीप की अक्षर? अफगाणिस्तान विरुद्ध कोणाला मिळालं ‘बेस्ट फिल्डर’चं मेडल?
क्रिकेट विश्वचषकात मिचेल स्टार्कचा दबदबा! या बाबतीत टाकलं सर्व दिग्गजांना मागे
भारताच्या अफगाण विजयाचे 5 नायक, टीम इंडियाच्या या खेळाडूंनी निभावली महत्त्वाची भूमिका