टी२० विश्वचषक स्पर्धेत बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत आपला पहिला विजय नोंदवला. या सामन्यात रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी शानदार फलंदाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. या सामन्यात भारताने निर्धारित २० षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात २१० धावा केल्या होत्या. २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून १४४ धावाच करू शकला. सामन्यादरम्यान रविंद्र जडेजाने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला. त्याचा हा प्रयत्न पाहून क्रिकेट चाहते अवाक् झाले.
अफगाणिस्तानच्या डावादरम्यान रवींद्र जडेजाने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. जर हा झेल पकडला गेला असता तर तो या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल ठरू शकला असता. मात्र चेंडू जमिनीला स्पर्श करत असल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले. त्यामुळे पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केले.
जडेजाचा झेल घेण्याचा प्रयत्न पाहून चाहतेही थक्क झाले होते. अफगाणिस्तानच्या डावाच्या 19 व्या षटकात, फलंदाज करीम जनतने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू बराच वेळ हवेत उडाला. जडेजा सीमारेषेवरून धावत आला आणि सुंदर ड्राईव्ह मारत झेल घेतला. मैदानावरील पंचाने यावर त्वरित फलंदाजाला बाद असा निर्णय दिला, पण रिव्ह्यूमध्ये करीम जनत नाबाद घोषित झाला.
Superb fielding effort by Ravindra Jadeja! #INDvsAFG pic.twitter.com/UsMlzAKR6x
— Doordarshan Sports (@ddsportschannel) November 3, 2021
तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अर्धशतकांच्या जोरावर आणि रविचंद्रन अश्विनच्या धारदार गोलंदाजीमुळे टी२० विश्वचषकाच्या सुपर १२ टप्प्यातील गट २ मध्ये अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव करून आपल्या विजयाचे खाते उघडले आहे.
भारताने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ सात गड्यांच्या मोबदल्यात १४४ धावाच करू शकला. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने ३२ चेंडूत ३५ धावा केल्या, या खेळीत त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. तर करीम जनत २२ चेंडूत नाबाद ४२ धावांची खेळी साकारली आपल्या खेळीत त्याने तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारीही केली.
महत्त्वाच्या बातम्या-
तू खिंच मेरी फोटो! चौकार मारल्यानंतर स्कॉटिश फलंदाजाची ऍक्शन पाहून बोल्टने काढला फोटो -Video
जेव्हा राहुल द्रविडचा टी२०त पाहायला मिळाला होता ‘रुद्रावतार’, मारले होते सलग ३ गगनचुंबी षटकार
भारत वि. अफगाणिस्तान सामन्यास तालिबानी नेत्याने लावली हजेरी, व्हिडिओ पोस्ट करत दिला संदेश